पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहांत पाणीटंचाई

पाण्यासाठी विद्यार्थ्यांची धावाधाव : टॅंकरने केला जातोय पाणीपुरवठा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून विद्यापीठात पाणी नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. पाणीटंचाईने विद्यार्थ्यांचे दैनदिंन नियोजन कोलमडले आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून विद्यापीठाला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने विद्यापीठात पाण्याची कमतरता आहे. टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र तो अपुरा पडत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

विद्यापीठात मुलींचे आणि मुलांचे वसतिगृह मिळून साधारण साडेतीन हजार विद्यार्थी वसतिगृहांमध्ये राहतात. गेल्या तीन चार दिवसांपासून विद्यापीठातील वसतिगृहांत पाणी नसल्याने विद्यार्थी मिळेल त्या ठिकाणी पाणी आणण्यासाठी जाताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणीही मिळत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसापांसून वसतिगृहांत पाणी नाही. आंघोळीला पाणी मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

पाण्याची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र विद्यापीठात दिसून येत आहे. विद्यापीठ प्रशासनाला महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याचे माहित असताना ही याबाबत पर्यायी व्यवस्था विद्यापीठाने करणे आवश्‍यक होते. विद्यापीठाने तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

एकीकडे विद्यापीठाच्या सर्व विभागांमध्ये पाणी आहे. बागेला पाणी आहे. मात्र, वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी आणि पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. टॅंकरचे पाणी 10 मिनिटेही पुरत नाही. ऐन परीक्षेच्या कालावधीत पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने तत्काळ टॅंकरची संख्या वाढवून पाणीपुरवठा सुरळीत करावा.
– अमित ढेकळे, विद्यार्थी.


महापालिकेकडून विद्यापीठाला पाणीपुरवठा कमी होत आहे. त्यामुळे विद्यापीठात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुुरु आहे. वसतिगृहांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, टॅंकरचे पाणी अपुरे पडत आहे. अद्याप पाणीपुरवठा सुरळीत सुरू झालेला नाही. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल.
– टी. डी. निकम, वसतिगृह प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.