पुणे – शहरातील कमाल तापमानात किंचीत घट झाली असली तरी दुपारचा उन्हाचा चटका असह्य करणारा आहे. शनिवारी (दि. ३०) शिरूर परिसरात सर्वाधिक ४१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर कोरेगाव पार्क, वडगावशेरी आणि इंदापूर भागातील कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात पुढील २४ तासांत हवामान कोरडे आणि दुपारनंतर ढगाळ राहील. रात्री उबदार वातावरण राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
सकाळी ११:०० पासून उन्हाचा चटका सुरू होत असून, दुपारी १२:०० ते ०२:०० च्या दरम्यान कडक ऊन आहे. ०४:००नंतर शहरात ढगाळ वातावरण झाले होते. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून, दि. १ एप्रिलनंतर उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.