- नैराश्यातून उचलले पाऊल : मावळ तालुक्यातील जांभूळ येथील घटना
वडगाव मावळ – बेरोजगारीमुळे नैराश्य आलेल्या उच्चशिक्षित चार्टर्ड अकाऊटंटने (सीए) पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. जांभूळ (ता. मावळ) येथील व्हिजन सिटी येथील रो-हाउसमध्ये रविवारी (दि. 13) सायंकाळी साडेसात वाजता ही खळबळजनक घटना उघडकीस आली. प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही, त्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची बाब आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या “सुसाइड नोट’वरून उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विनयकुमार मुकुदंराव भांबुर्डेकर (वय 39, रा. आकुर्डी. सध्या रा. रो-हाउस नं 07, व्हिजन सिटी, जाभूंळ, ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी प्रसाद मुकुंदराव भांबुर्डेकर (वय 43, रा. विवेकनगर, आकुर्डी) यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका खासगी कंपनीत विनयकुमार हे सीए म्हणून नोकरी करीत होते. मात्र काही कारणांमुळे त्यांची नोकरी गेली आणि ते बेरोजगार झाले. गेल्या काही दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. रविवारी (दि. 13) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी प्रसाद यांना मयत विनयकुमार यांनी चर्चा झाली होती. त्यामध्ये माझी दिवसभरात दोन कामे आहेत. ती झाली की मी तुझ्याकडे जेवायला येतो, असे विनयकुमार यांनी फिर्यादी प्रसाद यांनी सांगितले होते. त्यानंतर आपण दोघे आपल्या जांभूळ येथील रो-हाउसवर जाऊ. तिथून जांभूळ येथील फ्लॅटवर देखील जाऊ, असे ठरले.
मात्र, विनयकुमार हे दुपारी जेवायला घरी आले नाहीत. त्यानंतर प्रसाद यांनी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता विनयकुमार यांचा फोन बंद होता. त्यामुळे प्रसाद हे त्यांच्या एका नातेवाईकासोबत जांभूळ येथील विनयकुमार यांच्या रो-हाउसवर गेले. तिथे विनयकुमार यांची गाडी होती. घराचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. घरात दुसऱ्या मजल्यावरील पंख्याला दोरीने गळफास घेतल्याचे दिसले. विनयकुमार यांचे शरीर थंड पडले होते. जवळच विनयकुमार यांनी एक “सुसाइड नोट’ लिहून ठेवली असल्याचे निदर्शनास आले.
व्हॉटस्ऍप स्टेटसवर “फायनली आर. एच. 07′
दरम्यान, पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करीत असताना विनयकुमार यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांना अन्य कंपनीमध्ये नोकरी मिळत नव्हती’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. या संदर्भात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच विनयकुमार यांनी त्यांचे व्हॉटस्ऍप स्टेटस “फायनली आर एच 07′ असे ठेवले होते. याचा अर्थ काय? यातून त्यांना काय सांगायचे होते. मृतदेहाचे विच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी केले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी रवींद्र रॉय तपास करीत आहेत.