हिंजवडी – पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) च्या सदस्य पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली. मुळशी तालुक्यातील सरपंचांमधून पीएमआरडीए सदस्यपदी राष्ट्रवादीचे मुलखेड गावचे सरपंच सुखदेव तापकीर विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीने या निवडणुकीत कॉंग्रेस, शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत करत ग्रामीण भागात पक्षाची ताकद दाखवून दिली.
तापकीर हे मुलखेड गावचे विद्यमान सरपंच आहेत. खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी गावोगावी विकासकामांना भरीव निधी दिल्याने तसेच मुळशीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गटतट विसरून गावोगावी शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा राबविल्यानेच पक्षाला हे घवघवीत यश मिळाल्याचे सभापती पाडुरंग ओझरकर यांनी दै. प्रभात शी बोलताना सांगितले.
निवडीनंतर विजयी शिलेदारासह राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी पौडला पंचायत समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला. या वेळी सभापती पांडुरंग ओझरकर, तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, माजी सभापती रवींद्र कंधारे, गटविकास अधिकारी संदीप जठार, उपसभापती विजय केदारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पाडुरंग राक्षे, युवक अध्यक्ष नीलेश पाडाळे, माजी सरपंच बाळासाहेब तापकीर, माऊली कांबळे, संदीप साठे, सचिन आढाव यांच्यासह पक्षसंघटनेतील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते फेटा बांधून नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.पुणे महानगर नियोजन समिती (पीएमआरडीए) मुळशी तालुक्यातून सदस्य पदासाठी एकूण 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कॉंग्रेसच्या निकिता सणस (भूगाव), राष्ट्रवादीचे सुखदेव तापकीर (मुलखेड), शिवसेनेच्या सुरेखा तोंडे (खेचरे), भाजपचे मिनाथ कानगुडे (वेगरे) या उमेदवारांमध्ये ही लढत झाली.