वडगाव मावळ – मावळ तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघ सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर यांनी बरखास्त केला. तसेच प्रशासकीय कामकाजासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
दरम्यान सत्तेचे राजकारण व काही संचालकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अल्पावधीतच संचालकांमधील मतभेदाला सुरुवात झाली. चार संचालकांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या. यामध्ये संबंधित चारही संचालकांवर अपात्रतेची कारवाई झाली. तर तब्बल २५ ते ३० वर्षे सलग संचालक म्हणून कार्यरत असलेल्या अंकुश आंबेकर व सोपानराव कदम या दोन संचालकांनी गेल्या महिनाभरात राजीनामे दिले. त्यामुळे, दि.३० नोव्हेंबर व ७ डिसेंबर रोजी झालेली संस्थेची मासिक सभा व तहकूब सभा अशा दोन्ही सभा कोरमअभावी रद्द झाल्या. याबाबतचा अहवाल सचिव धनंजय बर्गे यांनी सहाय्यक निबंधक कांदळकर यांच्याकडे पाठविला. त्यानंतर त्यांनी संबंधितांना नोटिसा पाठवून सुनावणी घेतली व संघ बरखास्त करून प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूकही केली.
सहा महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती
मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघ बरखास्त केल्यानंतर संघाचे प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून बी. जे. पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. पुढील सहा महिने ते संस्थेचे प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. संस्थेची निवडणूक लावून पुढील संचालक मंडळाच्या ताब्यात कारभार देणार आहेत.
संघाच्या ५१ लाखांच्या ठेवी
मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाची स्थापना १९७२ साली झाली. वडगाव मावळ येथे मावळ पंचायत समितीच्या आवारात संस्थेचे स्वतःचे कार्यालय आहे. संबंधित कार्यालयाचे नूतनीकरण गतवर्षी झालेल्या निवडणुकीपूर्वीच मागील पंचवार्षिक कालावधीतील काही ज्येष्ठ संचालकांच्या पुढाकाराने करण्यात आले असल्याने संस्थेचे सुसज्ज कार्यालयही आहे. याशिवाय तब्बल ५१ लाखांच्या ठेवी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत आहेत.
सत्तेच्या राजकारणातून कुरघोड्या?
कोट्यावधी रूपयांच्या ठेवी असलेल्या खादी ग्रामोद्योग संघाची निवडणूक गतवर्षी झाली. यामध्ये अंकुश आंबेकर, गणेश भांगरे, सुदेश गिरमे, चंद्रकांत दहिभाते, सोपानराव कदम, कल्पना कांबळे, कांचन भालेराव, अमित ओव्हाळ, सूरज बुटाला व उमाजी भांडे हे १० संचालक विजयी झाले, तर एक जागा रिक्त राहिली. त्यानंतर सत्तेच्या राजकारणाला सुरुवात झाली. यामध्ये चेअरमनपदी कांचन भालेराव तर, व्हाईस चेअरमनपदी अमित ओव्हाळ यांची निवड झाली.