तळेगाव दाभाडे – एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने काही जणांनी मिळून तळेगाव दाभाडे येथील डॉ. श्रीहरी डांगे यांची तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी डॉ. श्रीहरी डांगे यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.
डॉ. श्रीहरी डांगे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांच्यामार्फत पोलीस महासंचालकांना निवेदन दिले आहे. डॉ. डांगे यांचे तळेगाव दाभाडे येथे श्री डायग्नोस्टिक सेंटर आहे. डॉ. डांगे आणि त्यांच्या पत्नी ते सेंटर चालवतात. व्यवसायाची गरज म्हणून डॉ. डांगे यांना एमआरआय मशीनची गरज होती. त्यासाठी मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) या कंपनीशी त्यांनी संपर्क साधला.
कंपनीने डॉ. डांगे यांना एमआरआय मशीनचे कोटेशन पाठवले आणि दोन कोटी चार लाख रुपये आगाऊ मागितले. डॉ. डांगे यांनी सर्व रक्कम आगाऊ दिली. तरीही मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) या कंपनीचे भागीदार तुलसी पितांबरदास मनेक, निरव हसमुखराय पंचमाटिया, जर्नल सिंग प्रेमसिंग बावा, इम्तियाज अकबर अली पोरबंदरवाला, डॉ. मेघा निरव पंचमाटिया (सर्व रा. मुंबई) यांनी एमआरआय मशीन पाठवली नाही.
याबाबत डॉ. डांगे यांनी चौकशी केली असता सर्व भागीदार मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग (इंडिया) ही कंपनी अन्य व्यक्तीला विकून पसार झाले होते. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आरोपींकडे पैसे मागितले. त्यातील भागीदार जर्नलसिंग प्रेमसिंग बावा याने डॉ. डांगे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी फेब्रुवारी 2018 रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन तब्बल साडेतीन वर्ष उलटून गेली आहेत. मात्र अद्यापही पोलिसांना आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी डॉ. डांगे यांनी पोलीस महासंचालकांकडे केली आहे.