पुणे – मागील दोन दिवसांपासून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य माध्यमांमध्ये चर्चेत आहे. नारायण राणे यांना अटकही झाली होती. त्यातच महाविकास आघाडीतील मंत्री अनिल परब यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे भाजप आक्रमक झाले होते. त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राणे यांच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब यांनी दबाव टाकला. त्यांनी मंगळवारी गृहखात्याच्या कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयित असल्याचा आरोप भाजपनेते आशिष शेलार यांनी केला होता.
यावर अजित पवार यांना पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर पवारांनी संभाषण काय झालं, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. तसेच परब हे पालकमंत्री आहेत. जिल्ह्यातील एखाद्या घटनेची सूचना पोलीस आयुक्त फोन करून देत असतात. ती एक पद्धत आहे. परब यांना देखील त्याच पद्धतीने फोन करून सूचना देण्यात आली असेल, असंही अजति पवारांनी नमूद केलं.
तत्पूर्वी राणे प्रकरणात दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह IPS अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. हे सांगताना, त्यांनी एक व्हिडीओ क्लिप दाखवून अनिल परब यांच्यासह सरकारवर हल्लाबोल केला होता.