मुंबई – करोनाच्या लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली माथेरानची लोकप्रिय “टॉय ट्रेन’ पुन्हा सुरू झाली आहे. करोनाची साथ काहीशी आटोक्यात आल्यानंतर सुरू झालेल्या अनलॉकनंतर गेल्यावर्षी 4 नोव्हेंबरला माथेरानची लोकप्रिय “टॉय ट्रेन’ अर्थात, माथेरानची छोटी रेल्वेगाडी पुन्हा एकदा सुरू झाली. या गाडीतून प्रवास करत पर्यटकांनी माथेरानची वाट धरायला पुन्हा एकदा सुरूवात केली.
दोनच दिवसांपूर्वी म्हणजे 12 फेब्रुवारीला 1 हजार 70 पर्यटकांनी या गाड्यांमधून प्रवास केल्याची नोंद झाली आहे. पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्यामुळे अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या रेल्वेच्या फेऱ्या हळूहळू 4 वरून 14 पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संस्मरणीय प्रवासासह निसर्गाला जवळून पाहण्याचा आनंद प्रवासी लुटत आहेत. याबरोबरच. स्थानिकांना उदरनिर्वाहाची संधी मिळत आहे आणि माथेरानची अर्थव्यवस्था सुधारण्यास हातभारही लागत आहे.