पुणे – पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत ब गटात केडन्स संघाने अव्वल स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत ब गटाच्या लढतीत अर्शिन कुलकर्णी(1-27 व 51धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर केडन्स संघाने अँबिशियस स्पोर्टस क्लब संघाचा 7 गडी राखून पराभव केला.
केडन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अँबिशियस स्पोर्टस क्लब संघाने 45 षटकात 7 बाद 225 धावा केल्या. यात सिद्धांत दोशीने (69 धावा) व मल्हार वंजारी (31 धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 79 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित हडकेने नाबाद 53 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. केडन्सकडून प्रद्युम्न चव्हाण (3-37), राझीक फल्लाह (2-39), अर्शिन कुलकर्णी (1-27) यांनी सुरेख गोलंदाजी करत अँबिशियस स्पोर्टस क्लबला मोठे आव्हान उभारण्यापासून रोखले.
हे आव्हान केडन्स क्रिकेट अकादमी संघाने 38.3 षटकात 3 बाद 227 धावा करून पूर्ण केले. सलामीची जोडी अथर्व धर्माधिकारीने 86 चेंडूत 11 चौकाराच्या मदतीने 83 धावा, अर्शिन कुलकर्णीने 63 चेंडूत 4 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 51 धावा केल्या. अथर्व व अर्शिन यांनी पहिल्या गड्यासाठी 126 चेंडूत 111 धावांची भागीदारी करून संघाला भक्कम सुरुवात करून दिली.
त्यानंतर फलंदाजीस आलेल्या हर्षल काटेने (नाबाद 38 धावा) व कौशल तांबेने (नाबाद 23 धावा) यांनी चौथ्या गड्यासाठी 26 चेंडूत 34 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. अँबिशियस स्पोर्टस क्लबकडून मल्हार वंजारीने 34 धावात 2 गडी, तर ऋषिकेश बारणेने 33 धावात 1 गडी बाद केला. सामन्याचा मानकरी अर्शिन कुलकर्णी ठरला.