माथेरान – आठवड्याभरातल्या मुंबईतल्या धावपळीच्या जीवनानंतर थकल्या भागल्या मुंबईकरांसाठी विश्रांतीसाठी जवळचं ठिकाण म्हणजे माथेरान! कोरोनाची साथ काहीशी आटोक्यात आल्यानंतर सुरू झालेल्या अनलॉकनंतर गेल्यावर्षी ४ नोव्हेंबरला माथेरानची लोकप्रिय ‘टॉय ट्रेन’ अर्थात, माथेरानची छोटी रेल्वेगाडी पुन्हा एकदा सुरू झाली. या गाडीतून प्रवास करत पर्यटकांनी माथेरानची वाट धरायला पुन्हा एकदा सुरूवात केली.
दोनच दिवसांपूर्वी म्हणजे १२ फेब्रुवारीला १ हजार ७० पर्यटकांनी या गाड्यांमधून प्रवास केल्याची नोंद झाली आहे. पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्यामुळे अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या रेल्वेच्या फेऱ्या हळूहळू ४ वरून १४ पर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संस्मरणीय प्रवासासह निसर्गाला जवळून पाहण्याचा आनंद प्रवासी लुटत आहेत. याबरोबरच.
स्थानिकांना उदरनिर्वाहाची संधी मिळत आहे आणि माथेरानची अर्थव्यवस्था सुधारण्यास हातभारही लागत आहे.