Jui Gadkari : छोट्या पडद्यावरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. सध्या जुई ‘ठरलं तर मग’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेच्या शूटसाठी जुई मालिकेचा संपूर्ण क्रू मेंबरसह शूटिंगसाठी माथेरानला पोहचली आहे. माथेरानमध्ये पर्यटकांनी टाकलेला कचरा पाहून तिने संताप व्यक्त केला आहे. याबाबतचा तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
सुंदर निसर्गाने नटलेल्या माथेरानमध्ये अनेक लोक पर्यटनासाठी येतात. मात्र येथे फिरायला आलेले पर्यटक त्यांच्यासोबत घेऊन आलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खाऊचे प्लास्टिकचे रॅपर तिथेच टाकून जातात. जुईने या सर्व पर्यटकांची कानउघडणी केली आहे आणि कचरा स्वतःच्याच घरात फेका असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
जुईने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये माथेरान येथील शारलोट तलावाचा निसर्गरम्य परिसर दाखवताना तिथे पसरलेल्या घाणीचं साम्राज्य देखील दाखवले आहे. पोस्ट मध्ये जुईने लिहिलं, “चांगले पर्यटक व्हा… चांगले नागरिक व्हा… चांगले मानव बना निसर्गाची काळजी घ्या. तरच आपली निसर्ग काळजी घेईल. मी हे बर्याचदा पाहते लोक कचरा जिथे फेकून द्यावासा वाटतो तिथेच टाकतात! डस्टबिनमध्ये फेकण्यापासून तुम्हाला काय अडवतं?”
पुढे तिने लिहिले की, “प्लास्टिक आणि इतर कचऱ्याने आच्छादलेली अशी सुंदर ठिकाणे पाहून मन हेलावून जाते… मित्रांनो समजूतदार व्हा किंवा जमत नसेल अशा ठिकाणी जाऊ नका. कचरा इतरत्र टाकणं थांबवता येत नसेल तर प्लिज आपल्या घरात तो नक्की फेका आणि त्यातच रहा!’, असे म्हणत तिने नाराजी व्यक्त केली आहे.