- नवीन अध्यक्ष कार्यालयात फिरकलेदेखील नाहीत
- पिंपरी-चिंचवड माथाडी बोर्डाचा हेकेखोरपणा
पिंपरी – मोठा गाजावाजा करून राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार मंत्रालयाने माथाडी व असंरक्षित कामगार मंडळावर सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्याची अंमलबजावणी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांत झाली. पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून सदस्यांच्या नेमणुका झाल्या. मात्र, उद्योगनगरीचे बिरूद मिरविणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात चिंचवड माथाडी मंडळाकडून राज्याच्या उपसचिवाच्या आदेशाला सोयीस्करपणे केराची टोपली दाखविली जात आहे.
उद्योगनगरीत पुणे जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयांतर्गत चिंचवड येथे माथाडी बोर्ड कार्यरत आहे. पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यक्षेत्रात पिंपरी, चिंचवड, तळेगाव, चाकण, खेड या औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांचा समावेश होतो. माथाडी मंडळात काम करताना या कामगारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. मागील अनेक वर्षांपासून माथाडी मंडळावर सदस्याची नेमणूक न झाल्यामुळे कामगारांचे अनेक प्रश्न मंडळाकडे प्रलंबित आहेत.
राज्याच्या कामगार मंत्रालयाने पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून सदस्यांची तीन महिन्यांपूर्वी नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. तसे पत्रही राज्य शासनाकडून देण्यात आले. मात्र, चिंचवड माथाडी बोर्डाकडून केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत. बोर्डाच्या सध्याच्या सल्लागार समितीच्या संचालकांकडून जबाबदारी झटकण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड माथाडी मंडळांतर्गत येणाऱ्या माथाडी कामगारांच्या प्रश्नावर नवनियुक्त सदस्यांची एकही बैठक झाली नाही. उलट पुणे माथाडी मंडळाकडून नवनियुक्त सदस्यांच्या तीन बैठका झाल्या आहेत. पिंपरी चिंचवड एमआयडीसीसह सात तालुक्यांची जबाबदारी असलेल्या या विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजामुळे कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक माथाडी कष्टकरी योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत. पुणे शहरापेक्षा जास्त भरणा शहरातील कामगारांकडून पिंपरी चिंचवड माथाडी मंडळात जमा होतो. पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांना 30 टक्के लेव्ही तर, पुणे जिल्ह्यातील कामगारांना 35 टक्के लेव्ही देण्यात येते असा फरक का? असा प्रश्न नोंदीत माथाडी कामगारांना पडला आहे.
प्रशासनाने सध्याच्या माथाडी बोर्डाच्या अध्यक्षांकडून पिंपरी चिंचवड माथाडी बोर्डाची अध्यक्षीय जबाबदारी नवीन अधिकाऱ्यांकडे दिली आहे. नवीन अध्यक्षांची एका महिन्यापूर्वीच या विभागात नियुक्ती झालेली आहे. मात्र, ते काही अज्ञात करणामुळे अजूनपर्यंत कार्यालयात रुजू झालेले नाहीत. आठवडाभरात ते कार्यालयाचा पदभार स्वीकारतील.
– डी. डी. पवार, सरकारी कामगार अधिकारी, पिंपरी चिंचवड माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ