#IPL2020 : मुंबईच्या ट्‌विटमुळे फिक्‍सिंगची चर्चा

आबुधाबी – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात फिक्‍सिंग झाले का, अशी शंका निर्माण झालेली आहे. मुंबई संघाने हा सामना सुरू होण्यापूर्वीच आम्हीच जिंकणार असे ट्‌विट व्हायरल केले होते, त्यामुळे हा संशय व्यक्त करण्यात येत असून सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाल्यावर मुंबई संघ व्यवस्थापनाने हे ट्‌विट डिलिट केले. 

2013 साली या स्पर्धेत स्पॉट फिक्‍सिंग घडले होते. त्यानंतर बीसीसीआयने दोषींवर कठोर कारवाईही केली होती. या घटनेनंतर मात्र, पुन्हा असा प्रकार घडला नव्हता. यंदाच्या स्पर्धेत काही सामन्यांच्या निकालाबाबत सातत्याने या चर्चा होत असून त्यात मुंबईच्या ट्‌विटमुळे आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.

रविवारी हा सामना सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हे ट्‌विट केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोशल मीडियावर या चर्चांना ऊत आला होता. त्यात दिल्लीचा संघ 163 धावा पूर्ण करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी सामना सुरू झाला होता व दिल्लीच्या 1 बाद 7 धावा झाल्या होत्या.

संपूर्ण 20 षटकांत दिल्लीने 4 बाद 162 धावा केल्या व फिक्‍सिंगच्या चर्चांनी जोर धरला. त्याचवेळी हे ट्‌विट डिलिट करण्यात आले. दिल्लीचा संघ किती धावा करणार हे मुंबइने ट्‌विट केल्यावर हा संशय व्यक्त होत असल्याचे संघ व्यवस्थापनाला समजले व त्यांनी हे ट्विट डिलिट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.