फलटण – नीरा उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाला होत असलेला विरोध अधिक तीव्र झाला आहे. फलटण तालुक्यातील 22 गावांमधील हजारो शेतकरी आणि नागरिकांनी मंगळवारी फलटण येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. या मोर्चासाठी शेतकऱ्यांनी शेकडो ट्रॅक्टर आणले होते.
फलटण तालुक्यातील तडवळे बंगला ते रावडी या चार किलोमीटर अंतरात नीरा उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम
जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वी सुरू केले आहे. मात्र, अस्तरीकरणामुळे कालव्यालगतच्या विहिरी व कूपनलिका बंद पडण्याच्या भीतीने तडवळे, सुरवडी, मुरुम, रावडी बुद्रुक, रावडी खुर्द, खामगाव, होळ, डोंबाळवाडी, कुसुर, पाडेगाव, खराडेवाडी, निंभोरे, वडजल, भिलकटी, चौधरवाडी, साखरवाडी, सासवड, पाडेगाव, निंभोरे, तरडगाव, काळज, घाडगे मळा या ग्रामपंचायतींनी ग्रामसभांमध्ये ठराव करून या कामाला विरोध केला आहे. हा विरोध तीव्र होत असून, या गावांमधील हजारो शेतकरी, महिला व नागरिकानी फलटण येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला होता.
सुमारे दीडशे ट्रॅक्टर घेऊन शेतकरी यात सहभागी झाले होते. त्यामुळे फलटण-लोणंद या पालखी मार्गावर सुमारे चार किलोमीटर अंतरात ट्रॅक्टरची रांग लागली होती. मोर्चातील ट्रॅक्टर दुपारी 12 च्या सुमारास फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात दाखल झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, पुढे पायी मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाच्या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, क्रांतिसूर्य महात्मा फुले पुतळा यांना पुष्पहार घातल्यानंतर मोर्चा दुपारी 2 च्या सुमारास प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चातील महिला व शेतकऱ्यांनी “अस्तरीकरण हटाव, शेतकरी बचाव’, “जल है तो, कल है’, “शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. महिलांनी फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले आणि पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी मिलिंद सपकाळ यांना निवेदन दिले. कोणत्याही परिस्थितीत कालव्याचे अस्तरीकरण करू नये, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. सर्व राजकीय पक्षांचे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि फलटण शहरचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांनी पुरेसा बंदोबस्त ठेवल्याने मोर्चा शांततेत झाला.