लाहोर – पीएणेश-एन पक्षाच्या नेत्या आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम नवाझ यांनी आज पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या.
पंजाब प्रांताच्या विधानसभेमध्ये त्यांची मुख्यमंत्री म्हणून बहुमताने निवड करण्यात आली. ही गोष्ट देशातील महिलांसाठी अभिमान वाटावी, अशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंजाब प्रांताच्या विधानसभेमध्ये इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या पाठिंब्यावरील सुन्नी-इत्तेहाद-कौन्सिलच्या सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर मरियम यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.
पंजाब प्रांताच्या ३२७ सदस्यांच्या विधीमंडळात मुख्यमंत्री निवडीच्यावेळी मरियम यांना २२० मते मिळाली. त्यांनी पीटीआयच्या पाठिंब्यावरील एसआयसीचे उमेदवार राणा आफताब यांचा पराभव केला.
एसआयसीने निवडणुकीवर बहिष्कार घातल्यामुळे आफताब यांना एकही मत मिळाले नाही. सरकार स्थापण्यासाठी किमान १८७ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. हा आकडा पीएमएएल-एनच्या सदस्यांनी सहज गाठला.
विधीमंडळातील आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी देव, वडील नवाझ शरीफ, काका शेहबाझ शरीफ आणि आपल्याला मतदान करणार्या आमदारांचे आभार मानले. आपले वडील पूर्वी ज्या जागेवर बसत असत,
त्याच जागेवर बसण्याची संधी आपल्याला मिळाल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला वडिलांनीच सरकार कसे चालवायचे याचे शिक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले. मरियम या नवाझ शरीफ यांच्या राजकीय वारसदारच आहेत.
सूडाचे राजकारण करणार नाही…
आपल्याला आतापर्यंत तुरुंगवास बघायला मिळाला आहे. मात्र यामुळे मी अधिक कठोर झाले. याबद्दल मरियम यांनी आपल्या विरोधकांना धन्यवादच दिले आहेत.
मात्र या त्रासाबद्दल आपण विरोधकांवर सूड उगवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचा रोख माजी लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश साकिब निसाद यांच्याकडे होता.