वॉशिंग्टन :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी अमेरिका दौऱ्यादरम्यान 23 जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात आफ्रिकन-अमेरिकन गायिका अभिनेत्री मेरी मिलबेन या सहभागी होणार आहेत. मेरी मिलबेन यांनी यापूर्वी “ओम जय जगदीश हरे’ आणि राष्ट्रगीत “जन गण मन’ गायलेले असल्यामुळे त्या या कार्यक्रमात काय गीत सादर करणार आहेत, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
मिलबेन या 21 जून रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयामध्ये 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामध्येही सहभागी होणार आहेत.
मोदींच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मिलबेन यांना या दौऱ्याचे नियोजन करणाऱ्या सुकाणू समितीच्या वतीने औपचारिक निमंत्रण देण्यात आले आहे. “युनायटेड स्टेटस इंडियन कम्युनिटी फाउंडेशन’च्या वतीने केवळ भारतीय समुदायांशी मोदींच्या वार्तालापाचे आयोजन केले गेले आहे.
वॉशिंग्टनमधील रोनाल्ड रेगन बिल्डिंग आणि इंटरनॅशनल ट्रेड सेंटरमध्ये 23 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करण्यास मिलबेन यांनी सहर्ष होकार कळवला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याबद्दल आपल्याला खूपच उत्सुकता असल्याचे मिलबेन यांनी सांगितले.
आपल्याला सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांनी सुकाणू समितीचे आभारदेखील मानले आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी गायन म्हणजे आपल्यासाठी बहुमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.