जकार्ता – भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने येथे पार पडलेल्या इंडोनेशिया ओपन मास्टर्स सुपर सीरीज 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे रविवारी विजेतेपद पटकावले.
या जोडीने ऐतिहासिक कामगिरी करताना अंतिम फेरीत मलेशियाच्या आरोन चिया व वुई यिक सोह या जोडीचा सरळ दोन गेममध्ये 21-17, 21-18 असा पराभव केला व विजेतेपद मिळवले. या कामगिरीसह भारताच्या या जोडीने या स्तरावरील 300, 500, 750 व 1000 दर्जा असलेल्या सर्व स्पर्धांची अंतिम फेरी गाठण्याचाही विक्रम साकार केला.
जागतिक क्रमवारीत पुरुष दुहेरीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या सात्विक साईराज व चिराग या जोडीने यंदा इंडोनेशिया स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली होती. एका बाजुला किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणोय व लक्ष्य सेन तसेच महिला एकेरीत दोन वेळची ऑलिम्पिक विजेती पी. व्ही. सिंधू पराभूत झाल्यावर सात्विक साईराज व चिराग जोडीवरच भारताच्या आशा होत्या.
त्यांनीही चाहत्यांना निराश न करता विजेतेपदावर नाव कोरले. अंतिम लढतीत या जोडीने मलेशियाच्या आरोन चिया व वुई यिक सोह या जोडीला तुल्यबळ लढत देत वर्चस्व कायम राखले. दोन्ही गेममध्ये मलेशियाच्या खेळाडूंना भारतीय जोडीची सर्व्हिस भेदण्यात तसेच आपल्या सर्व्हिस राखण्यात अपयश आले व त्याचा लाभ भारतीय जोडीने घेतला व नवा इतिहास रचला.