नवी दिल्ली – इंधनाचे दर वाढले असताना मारुती सुझुकी कंपनीने शुक्रवारी अचानक आपल्या विविध वाहनांच्या दरात वाढ करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. चलनाचे अस्थिर दर आणि कच्च्या मालाचे दर वाढल्याचे कारण सांगून कंपनीने दरवाढ जाहीर केली आहे.
कंपनीने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही मॉडेलच्या किमती 22,500 रुपयापर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना वितरकांना देण्यात आल्या असल्याचे दिसून येते.
कंपनीने याच कारणामुळे जानेवारी महिन्यामध्ये आपल्या विविध मॉडेलच्या किमती 34 हजार रुपयापर्यंत वाढविल्या होत्या. सध्या रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत बराच कमी आहे. त्यामुळे या कंपन्यांना वाहनांचे सुटे भाग आयात करताना जास्त खर्च लागत आहे. त्याचबरोबर वाहन कंपन्यांना सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे काही कंपन्यांच्या उत्पादनावरही परिणाम झाला असल्याचे बोलले जाते.
मारुती सुझुकी ही भारतातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने दरवाढ जाहीर केल्यानंतर इतर कंपन्याही दरवाढ जाहीर करतात. त्यामुळे आगामी काळामध्ये इतर वाहन कंपन्या दरवाढ जाहीर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे अगोदरच लोकांची क्रयशक्ती कमी झाली असतानाच वाहनांच्या किमती वाढत असल्याबद्दल ग्राहकाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.