कापूरहोळ – अल्पवयीन मुलगी असल्याचे माहिती असतानाही तिचा विवाह लावून देणे दोन्हीकडील मंडळींना चांगलेच महागात पडले आहे. राजगड पोलिसांनी कारवाई करत नवरदेव आणि अल्पवयीन मुलीचे आई-वडील, नातेवाईक अशा 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राजगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम रामचंद्र राजिवडे (वय 23, रा. हारपूड, ता. वेल्हे) या तरुणासोबत मुळशी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह रविवारी (दि. 7) आयोजित केला होता.
मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानासुद्धा दोन्हीकडचे आई-वडील आणि नातेवाईक हे विवाह लावत असल्याबाबत राजगड पोलीस ठाण्यात निनावी फोन आल्यानंतर पोलीस शिपाई सचिन नरुटे, मंगेश कुंभार, प्रशांत राऊत यांनी मंगल कार्यालयात जाऊन वधूच्या जन्म तारखेची शहानिशा केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.
हा गुन्हा असल्याचे संबंधितांना सांगून राजगड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई सचिन नरुटे यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी नवरा मुलगा शुभम रामचंद्र राजिवडे, रामचंद्र निवृत्ती राजिवडे (वडील), सीता रामचंद्र राजिवडे (आई, सर्व रा. हारपूड, ता. वेल्हे), अनिल रामभाऊ रेणुसे (मामा), वैशाली अनिल रेणुसे (मामी), आकाश सुनील राजिवडे, अभिषेक रवींद्र चव्हाण, कुणाल मधुकर शिरोळे, चैतन्य रामचंद्र राजिवडे, शंतनू शिवाजी पवार, कुशाल मधुकर शिरोळे आणि लग्न लावणारे ब्राह्मण सुनीलखासनीस यांच्यासह अल्पवयीन मुलीचे आई, वडील, मामा, मामी व इतर नातेवाईक या सर्वांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांना नोटीस देण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन तिच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस फौजदार संजय सुतनासे यांनी दिली.