ब्रह्मदेवाने जेव्हा ही सारी सृष्टी निर्माण केली. त्यावेळी त्याने प्रथम पृथ्वी, आप, वायू, तेज आणि आकाश ही पंचमहाभूतेही निर्माण केली. त्यानंतर त्याने सृष्टीमध्ये नाना प्रकारचे पर्वत, नद्या, पठारे, मैदान, जमीन आणि सागर तयार केले. मग वनस्पती निर्माण केल्या. त्यानंतर लहान मोठ्या आकाराचे अनेक प्राणी निर्माण केले.
त्या प्राण्यांमध्ये चार पायांचा दिमाखदार शेपटी असलेला, तीक्ष्ण कानांचा आणि वायूच्या वेगाने धावणारा असा एक प्राणी तयार केला. तो प्राणी म्हणजेच अश्व अर्थात घोडा. अश्वाचा विचार करायला गेले की आपल्याला सर्वात प्रथम आठवण येते ती देव दानव ह्यांच्या झालेल्या समुद्र मंथनातून वर आलेल्या चौदा रत्नांची. त्या चौदा रत्नातील एक रत्न म्हणजेच उच्चै:श्रवा नावाचा अश्व.
अश्व अर्थात घोडा हा देखणा, रुबाबदार, डौलदार दिमाखाच्या चालीने चालणारा उमदा प्राणी. या प्राण्याच्या जलद गतीने पळण्याच्या क्षमतेवरुनच ह्याची राजेरजवाड्यांच्याकडे हजेरी लागली. राजाच्या सैन्यात अश्वदल ह्या नावाचे स्वतंत्र दल निर्माण झाले. घोडा हे राजाच्या वैभवाचे, त्याच्या श्रीमंतीचे एक चिन्ह बनले. इतकेच नव्हे तर सूर्यासारख्या देवतेच्या रथाला सात घोडे आहेत असे आपण मानतो. तशी सूर्य स्तुतीत नोंदही आहे. देवतांनी त्याचे वाहन म्हणून पण स्वीकार केला आहे. या प्राण्यास संतांच्या दारातही मानाचे स्थान आहे.
आपल्या अनेक पौराणिक ग्रंथांतून ह्या प्राण्याची नोंद वाचायला मिळते. अनेक युद्धप्रसंगात त्याचे वर्णन आलेले आहे. श्रीरामाने सोडलेल्या अश्वमेध यज्ञाचा रथ लवांकुशांनी अडविला, त्यातूनच पितापुत्रांची भेट झाली, ही रामायणातील कथा तर सर्वश्रुत आहेच. घोडा हा एक प्रामाणिक, जीवाला जीव देणारा, धन्याशी इमान राखणारा प्राणी. इतिहासातील राणाप्रतापचा चेतक, झाशीच्या राणीचा घोडा, छत्रपती शिवरायांचा घोडा ह्यांच्या कथा आजही आपण वाचतोच.
आपल्या अगदी आधुनिक परिचयातला एक शब्द म्हणजे “हॉर्सपॉवर’ ह्याचाच अर्थ की अश्वशक्ती. एखादे यंत्र हे किती ताकदीचे आहे, किती शक्तीचे आहे, हे ज्या परिमाणावरून ठरविले जाते, त्याला हॉर्सपॉवर असे आपण म्हणतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा आणि पुरातन काळापासून ते अगदी आधुनिक काळापर्यंत आपले लोक मानसातले पसंतीचे स्थान टिकवून ठेवलेला हा प्राणी आजही वंदनीय आणि पूजनीय आहे.