इटलीमध्ये करोना नियंत्रणात येण्याची चिन्हे 

रोम – फ्लॅट्‌सच्या बाल्कनीमधून येणारी संगीताची धून, खिडक्‍यांमधून टाळयांचा गजर आणि नजीकच्या इमारतीतून एकत्रितपणे गाणे म्हणण्याचा आवाज इटलीत हे चित्र आता सर्वसामान्य ठरले आहे. करोनाच्या भीतीदरम्यान मनोबळ वाढविण्यासाठी नवनवे उपाय योजिले जात आहेत. गीत-संगीतादरम्यान रुग्णवाहिकेचा आवाजही नित्याचाच ठरला आहे.

इटलीत कोरोनाचे आतापर्यंत 27980 रुग्ण आढळून आले असून 2158 जणांचा मृत्यू झाला आहे. रोम ते नेपल्स तसेच व्हेनिस तामलोरेन्सपर्यंत लोकांनी स्वतःला घरांमध्ये कैद करून घेतले आहे. सर्व दुकाने बंद असून शासकीय आदेशानंतर सार्वजनिक ठिकाणेही बंद करण्यात आली आहेत. लोकांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अत्यावश्‍यक स्थितीतच घरातून बाहेर पडू दिले जात आहे. कोडोग्नो शहरात करोनाच्या संसर्गास प्रारंभ झाला होता, पण आता तेथील स्थिती नियंत्रणात आहे. टाळेबंदी करण्यात आलेले कोडोग्नो हे इटलीतील पहिले शहर ठरले होते. दोन आठवडयांमध्ये तेथे नवा रुग्ण आढळून आलेला नाही.

पंतप्रधान ग्यूसेप कोंटे यांनी पूर्ण इटलीत टाळेबंदीची घोषणा केली आहे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होमची सुविधा दिली आहे. कर्मचाऱ्यांना पगारी रजा घेण्यास सांगितले जात आहे. अत्यंत आवश्‍यक सामग्रीचे उत्पादन घेणाऱ्या प्रकल्पांमध्येच सुरक्षा आणि सतर्कतेसह काम सुरू आहे.
समाजमाध्यमांवर लोक एकमेकांशी अधिक संवाद साधत आहेत.

प्रसिद्ध गायक समाजमाध्यम संकेतस्थळाद्वारे घरातूनच थेट कॉन्सर्ट करत आहेत. प्रसिद्ध फॅशन ब्लॉगर शीरा फर्रानी यांनी गायक फेडेजच्या मदतीने रुग्णालयांकरता निधी जमविण्याचे काम हाती घेतले आहे. काही तासातच 3 दशलक्ष डॉलर्सचा निधी जमा झाला आहे. तर फॅशन डिझायनर जार्जियो अरमानी यांनी 4 रुग्णालये तसेच नागरी सुरक्षा सेवेला 1.25 दशलक्ष युरो देणगीदाखल दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.