आमीर खान भारतातील एक स्टार कलाकार आहे. त्याचे फॅन त्याच्या “परफेक्शनिस्ट’पणाबाबत विशेष अभिमानाने बोलत असतात. त्याच्या काही वक्तव्यांमुळे थोडीफार नाराजी निर्माण झाली असेल. पण त्याव्यतिरिक्त कोणत्याही गुन्ह्याशी त्याचे नाव जोडले गेलेले नाही. त्याला आतापर्यंत कोणत्याही गुन्ह्याचा आरोपी म्हणून घोषित करण्यात आल्याचे ऐकिवात नाही.
मात्र पाकिस्तानातील चॅनेलवाल्यांनी ही करामत करून दाखवली आहे. पाकिस्तानातील एका चॅनेलने आमिर खानला चक्क हत्या प्रकरणातील आरोपी घोषित केले आणि त्याचा फोटोही दाखवून टाकला. त्यामुळे मोठीच खलबळ निर्माण झाली आहे. ट्विटरसह अन्य सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चॅनेलला ट्रोल केले जाऊ लागले आहे.
प्रत्यक्ष्यात या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यावर सगळा गोंधळ केवळ आरोपीचे नाव “आमीर खान’ असल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. हा आरोपी भारतातील नाही, तर पाकिस्तानात गेल्या 17 वर्षांपासून राहणारा दुसराच कोणीतरी आहे. या आरोपीला 17 वर्षांनंतर हत्येच्या आरोपातून मुक्त करण्यात आल्याच्या बातमीमध्ये आरोपीऐवजी आमिर खानचा फोटो वापरला गेला होता. आता या चॅनलने आपली चूक दुरुस्त केली आणि माफीही मागितली आहे.