नगर – कृषी उत्पन्न बाजार समितीने ओपन स्पेसमध्ये (रेखांकनातील खुली जागा) बांधलेले नियमबाह्य व्यापारी संकुल पुन्हा अडचणीत आले आहे. महापालिका प्रशासनाने हे बांधकाम पाडून टाकण्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेविरुद्धचे अपिल फेटाळल्याने हे बांधकाम तत्काळ पाडून टाकावे, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी आज महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने खुल्या जागेत बांधलेल्या या व्यापारी संकुलाबाबत दोन वर्षांपूर्वी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनीच तक्रार केली होती. महापालिकेने प्राप्त तक्रारीवरुन या बांधकामाची शहानिशा केली. त्यावेळी या बांधकामास महापालिका नगररचना विभागाचा परवानाच नसल्याचे उघडकीस आले. त्याशिवाय हे बांधकाम खुल्या जागेत असल्याचा अभिप्राय पथकाने दिला होता.
त्यावरुन जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महानगरपालिका आयुक्त राहूल द्विवेदी यांनीच 21 जुलै 2018 रोजी हे नियमाबाह्य बांधकाम पाडून टाकण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बाजार समितीने आव्हान दिले होते. या आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे अपिल केले होते.
दरम्यान, राज्यमंत्री पाटील यांनी हे बांधकाम तत्काळ पाडण्यास स्थगिती दिली होती. शासकीय स्तरावर याची सुनावणी सुरु असल्याने हे बांधकाम पाडता येणार नसल्याचे पत्र नगरविकास मंत्री पाटील यांनी पाठविल्याने महानगरपालिकेस कारवाई करता आली नाही.
तथापि, जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी राज्यमंत्री पाटील यांना पत्र पाठविले होते. बाजार समितीकडून दाखल झालेले अपिल आपल्याकडे लागू होत नाही. तसेच मंजूर रेखांकनातील खुल्या जागेत हे बांधकाम झालेले असल्याने ते पाडणेच कायदेशीररीच्या योग्य ठरेल, असा अभिप्राय महापालिकेतर्फे दिला होता.
बाजार समितीने खुल्या जागेत बांधलेले नियमबाह्य व्यापारी संकुल पाडण्यासंदर्भात कारवाई अभिप्रेत आहे. महापालिकेनेच हे नियमबाह्य व्यापारी संकुल पाडण्यासाठी आदेश दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशाला स्थगिती मिळाल्याने बांधकाम पाडता आले नाही. आता नगरविकास विभागानेच बांधकाम पाडण्याच्या विरोधात दाखल झालेले अपिल फेटाळले आहे. त्यामुळे हे बांधकाम पाडण्याच्या मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने तत्काळ कारवाई करावी.
दिलीप सातपुते , शहरप्रमुख, शिवसेना, नगर.