पुणे – पानटपरीची थकबाकी भरण्यास सांगितल्याच्या रागातून आडत्यांच्या 2 मुलांसह इतर साथीदारांनी शुक्रवारी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. मार्केट यार्डच्या मुख्य प्रवेशद्वारावरच हा प्रकार घडल्यामुळे दहशतीचे वातावरण होते. मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी 2 ते 3 तास काम बंद आंदोलन केले. बाजार समितीचे सुरक्षा विभाग प्रमुख संभाजी काळजे यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
संबंधित टपरी चालकाची बाजार समितीत गेट क्रमांक 3 येथील गाळा क्रमांक 654 “अ’लगत पानटपरी आहे. या पानटपरीच्या भाड्याची मागील 3 ते 4 वर्षांची थकबाकी आहे. ती भरण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी संभाजी काळजे, विलास रायकर, सुरेश धोंडे हे बुधवारी गेले. त्यावेळी संबंधित टपरीवरील कामगाराने “माझ्या मालकास थकबाकी भरण्यास सांगतो’ असे सांगितले. त्यानंतर बाजार समितीचे कर्मचारी तेथून निघून गेले. त्यावेळी आडत्यांच्या मुलांनी तक्रारदार यांना फोन करून मार्केट यार्डच्या मुख्य प्रवेशद्वारावर बोलविले. टपरीवर गेल्याचा जाब विचारत काळजे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
बाजार आवारातच कर्मचाऱ्यांना मारहाण करणे दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली जाईल. सध्या संबंधितांची टपरी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
– बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती