पुणे -दिवाळीला झेंडूची मागणी वाढत असते. यासाठी दरवर्षी शेतकरी फुलं राखून ठेवतात. मात्र, यावर्षी बाजारात जास्त आवक होत आहे. परिणामी, भावात मोठी घट झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी फुलांची आवक वाढली आहे. तर भावदेखील निम्म्याने घटले आहेत.
दिवाळीत दुकाने, कार्यालये तसेच घरांची रंगीबेरंगी फुलांनी सजावट केली जाते. तसेच हार आणि पूजेसाठी झेंडू व शेवंतीच्या फुलांना विक्रेते, ग्राहकांकडून मोठी मागणी असते. त्यामुळे भावातही वाढ होते. मात्र, यावेळी मागणीच्या तुलनेत आवक अधिक होत आहे.
त्यामुळे भाव घटले आहेत. घाऊक बाजारात मोठ्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांना मंगळवारी 60 ते 70 रुपये, तर छोट्या आकाराच्या फुलांना 10 ते 30 रुपये भाव मिळाला.
तसेच शेवंतीच्या फुलांना प्रतिकिलोला 10 ते 50 रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतिच्या झेंडूच्या फुलांची 50 ते 100 रूपये किलोने विक्री केली जात आहे. मार्केटयार्डातील फुलबाजारात पुणे, सातारा, सोलापूर येथून झेंडूच्या फुलांची आवक होत आहे. परराज्यातून येणाऱ्या फुलांचे प्रमाण अत्याल्प आहे.
शेवंतीच्या फुलांची आवक पुणे आणि नगर जिल्ह्यातून होत आहे. येत्या दोन दिवसांत फुलांची आवक घटल्यास 10 ते 20 टक्क्यांनी भावात वाढ होऊ शकते. मागील वर्षीच्या तुलनेत 50 ते 60 टक्क्यांनी फुलांची आवक वाढली असल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी दिली.