सातारा – लहानपणी शालेय जीवनात “गणपतवाणी’ सारख्या ज्यांच्या कविता अभ्यासल्या, त्यातीलच एका कवीच्या स्मारकाचे काम पूर्णत्वासाठी आपल्याकडे यावे, हे मी माझे भाग्य समजतो. सातारचे कवी, पत्रकार श्रीनिवास वारुंजीकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली “मर्ढेकर दर्शन’ ही अनोखी दिनदर्शिका साहित्यप्रेमींसाठी मेजवानी ठरेलच; शिवाय या निमित्ताने मर्ढेकरांची कविता घराघरांत पोहचेल आणि नव्याने संवेदनशील कवी घडतील, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी तथा मर्ढेकर स्मारक समितीचे अध्यक्ष मिनाज मुल्ला यांनी केले.
बा. सी. मर्ढेकरांच्या 111 व्या जयंतीवर्षानिमित्त येथील कवी वारुंजीकर यांनी वर्ष 2021 साठी मर्ढेकरांच्या 12 कवितांचा समावेश असलेली “मर्ढेकर दर्शन’ ही अभिनव संकल्पना असलेली दिनदर्शिका तयार केली आहे. मकर संक्रातीच्या मुहूर्तावर या दिनदर्शिकेचे प्रकाशन मुल्ला यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रा. डॉ. देवानंद सोनटक्के, सौ. हर्षल राजेशिर्के, चित्रकार सागर गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार मधुसूदन पतकी, निवृत्त अभियंते दीपक कुलकर्णी आणि आकाशवाणीचे सचिन प्रभुणे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्राफिक डिझायनर दीपक पवार यांनी डिझाईन केलेल्या या दिनदर्शिकेमध्ये सागर गायकवाड यांनी चितारलेली चित्रे आणि मर्ढेकरांचे अल्पचरित्र सामावले आहे.
यावेळी बोलताना प्रा. सोनटक्के म्हणाले की, मर्ढेकरांच्या कवितांची दिनदर्शिका ही संकल्पनाच अभिनव असून, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या संक्रमणावेळी जगाने अनुभवलेले स्थलांतर, मानवी जीवनाची क्षणभंगुरता आणि एकटेपणाचे दु:ख आजही आपण अनुभवत आहोत. त्यांच्या कवितांमधली सर्वसामान्य माणसाची चित्रणे आजच्या काळासाठीही सुसंगत ठरत आहेत, म्हणूनच काळाच्या पुढती कविता लिहिणाऱ्या मर्ढेकरांचे आज या निमित्ताने स्मरण अत्यावश्यकच ठरते आहे. शिवाय या दिनदर्शिकेमध्ये ज्या त्या महिन्याच्या ऋतुमानानुसार कवितांचा असलेला क्रम लक्षवेधी असा आहे. तसेच आजवर मराठी साहित्यात कोणाही कवीच्या कवितांची दिनदर्शिका प्रसिद्ध झालेली नाही.
या दिनदर्शिकेमध्ये वापरण्यात आलेली काही चित्रे आपण मर्ढे गावातच मर्ढेकरांच्या कविता सादर केल्या जात असताना रेखाटलेली आहेत. त्या कार्यक्रमाच्या सरावावेळीच मला नेहमी जाणवत असे की, मर्ढेकरांच्या कविता कमालीच्या चित्रदर्शी असून त्यांच्या कविता कॅनव्हासवर रेखाटणे आवश्यक आहे, असे सांगून सागर गायकवाड म्हणाले की, या निमित्ताने मी रेखाटलेल्या या सर्वच चित्रांना एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. दीपक कुलकर्णी म्हणाले की, मर्ढेकरांच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद करुन, ती दिनदर्शिकाही सर्वत्र पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
प्रारंभी श्रीनिवास वारुंजीकर यांनी या दिनदर्शिकेमागील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी हर्षल राजेशिर्के, मनस्विनी लाटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाच्या अखेरीस मर्ढेकरांच्या विविध कवितांचे वाचन करण्यात आले. मर्ढेकरांचे कुटुंबिय असलेल्या सदाशिव पाडळीकर आणि रश्मी तुळजापूरकर यांचेही या उपक्रमाला मोलाचे योगदान लाभले आहे.