स्वच्छतागृहातील वस्तू दुसऱ्याच दिवशी गायब
येरवडा – केंद्रीय पथकाचा स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत पाहणी दौरा असल्याने येरवडा येथील कै. बिंदूमाधव ठाकरे चौकातील स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात आले. याठिकाणी वॉश बेसीन, हॅन्ड सॅनिटायझर, हॅन्ड वॉश लिक्विड, आरसा, टॉवेलही ठेवण्यात आले होते. परंतु, केंद्रीय पथक येऊन गेल्यानंतर या ठिकाणच्या स्वच्छतेसंदर्भातील सर्व वस्तू उचलून नेण्यात आल्याने येरवडा-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचा दिखाऊपणा उघड पडला आहे.
पुणे शहराने “स्वच्छ भारत सर्वेक्षणा’त सहभाग नोंदविला आहे. मागील वेळी शहरातील स्वच्छतागृह स्वच्छ नसल्याने स्पर्धेतून बाद होण्याची वेळ आली होती. आता, याच गोष्टीवर पालिका भर देत आहे. यातूनच केंद्रीय पथक येणार असल्याने येरवडा क्षेत्रिय कार्यालयाने स्वच्छतागृह चकाचक केले.
परंतु, स्वच्छते संदर्भातील ठेवण्यात आलेल्या सर्व वस्तू आज (दि.14) गायब झाल्या. याबाबत येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजय लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता तो “नॉट रिचेबल’ होते.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा