– ऍड. सीमंतिनी नूलकर
संतोष शिंत्रे यांचं “अशाश्वतच्या समशेरीवर: भारतातील हवामानबदल: अपाय आणि अपाय “हे पुस्तक अक्षरशः एका बैठकीत वाचलं. हवामानबदल या विषयावर अनेक तज्ज्ञांची पुस्तकं मराठीत उपलब्ध आहेत. पण हा विषय सर्वसामान्य माणसाला सरळ सोप्या भाषेत समजावला तरच संकटाशी झुंज घेता येईल या जाणिवेतून या पुस्तकाच्या निर्मितीचे महत्त्वाचं काम लेखक संतोष शिंत्रे यांनी केलेलं आहे. पुस्तकात अगदी आवश्यक तितकीच तांत्रिक चर्चा आहे.
हवामानबदल, तापमान वाढ, हरितगृह वायूंचे परिणाम, एल निनो, विरळ होणारा ओझोनचा थर या सगळ्या गोष्टी कानावर तर पडलेल्या असतात. पण त्या आपल्यासाठी नाहीत, अशी एक प्रामाणिक समजूत सामान्य माणसाची असते. ते जे काही आहे ते सरकार नाही तर शास्त्रज्ञ पाहून घेतील, अशी एक मनोवृत्ती दिसून येते. राजकीय नेत्यांचं किंवा पक्षांचं म्हणावं तर त्यांना ते वनखाते, पर्यावरण खाते यांनी निस्तरण्याचे लचांड वाटते. लेखकाच्या शब्दात म्हणायचं तर “काहीतरी व्हायला पायजेलाय’ या कॅटेगिरीत नेते मंडऴी हा विषय टाकून देतात.
पण हवामानबदल हा तुमच्या माझ्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचलेला विषय आहे. हा विषय देशाचा आणि नागरिकांचा आर्थिक विकास, गरिबी यासारख्या घटकांवर आणि सजीव सृष्टीच्या अस्तित्वावर प्रत्यक्ष परिणाम कसा करतो, याकडे लेखकाने वारंवार लक्ष वेधले आहे.
हवामानबदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी जागतिक स्तरावर काय घडत आहे, याबरोबरच सामान्य माणसाचा त्यात सहभाग किती महत्त्वाचा आहे याची सांगोपांग चर्चा पुस्तकात आहे. हवामान बदल ,तापमान वाढ यामुळे संपूर्णच सजीव सृष्टीवर घातक परिणाम झालेला आहे आणि वेळीच जाग आली नाही, तर भविष्यात अंधारच अंधार आहे.
काही वर्षांपासून पृथ्वीवरचा ओझोन थर विरळ झाला, तर त्यामुळे काय दुष्परिणाम होणार आहेत, याविषयी माध्यमातून, परिषदांतून, सर्वसामान्य नागरिकांमध्येही चर्चा होत होती. ओझोन थर विरळ होण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात वगैरे वापरली जाणारी घातक रसायनं जबाबदार होती. परंतु ओझोन थर विरळ होण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण आणण्यात जगाला यश आलेलं आहे. याचाच एक अर्थ असा की जर राजकीय नेतृत्वाने आणि सामान्य माणसांनीही मनावर घेतलं तर अशक्य ते शक्य होऊ शकतं. तसेच प्रयत्न हवामानबदल रोखण्यासाठी करणे जरुरीचे आहे.
तापमानवाढ ,हवामान बदल याच्याशी माझा काय संबंध असं कुणाही सामान्य माणसाला वाटेल. परंतु त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या गोष्टींकडं एक नजर टाकली तरी सामान्य माणूसही कसा जबाबदार आहे ते लक्षात येतं.
शहरं ही उष्णतेची बेटे झालेली आहेत आणि त्यासाठी सर्रास वापरले बांधकाम साहित्य, शहरात मोकळ्या-खुल्या जागा आणि वृक्षांची संख्या कमी असणं, वाहनांच्या अमर्याद वापरामुळे होणारे प्रदूषण अशासारखे घटक कारणीभूत आहेत. वाहनं, मोबाइल, कम्प्युटर, एअर कंडिशनर्स स्वयंपाक घरातली मायक्रोवेव्ह-फ्रिज सारखी उपकरणे यांचा हातभार हवामानबदलात मोठ्या प्रमाणात आहे. ही साधनं जास्त उत्पन्न असलेल्या गटातले लोक वापरतात. त्यामुळे त्या उत्पन्नगटाचा हवामान बदल, तापमानवाढ, उत्सर्जनात-प्रदुषणात मोठा वाटा आहे. गरीब लोकांचा वाटा नगण्य आहे. पण दुष्परिणामांच्या सगळ्यात जास्त झळा गरीब लोक किंवा कमी उत्पन्न गटातील लोकच सोसत असतात, हे विदारक सत्य हे पुस्तक प्रभावीपणाने समोर ठेवते.
हवामान बदलामुळे होणारे अनेक घातक परिणाम आपल्या डोळ्यांसमोर घडत असतात. परंतु त्याचं गांभीर्य आपल्याला समजत नाही. गेल्या वर्षीच पाकिस्तानकडून आलेल्या टोळधाडींमुळे उभी पिकं संपली. याचा संबंध हवामान बदलामुळे अरबी वाळवंटात उठणाऱ्या वादळांशी कसा आहे, हे या पुस्तकात लेखकाने सांगितले आहे . भारतातल्या सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जेवणात डाळी खाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचं सेवन वाढलेलं आहे. या प्रक्रिया केलेल्या अन्नाचे दुष्परिणाम होतात हे सगळेच जण म्हणतात. पण कचरा वाढ करण्यापासून शरीरावर किती घातक परिणाम करतात याविषयी अतिशय सोप्या भाषेत लेखकाने या पुस्तकात सांगितले आहे.
भारतातली ज्वारी, बाजरी, मका त्यासारखी पिकं ही हवामान बदलातही तगून राहणारी टिकून राहणारी पिकं आहेत. ते लक्षात घेऊन अशा पिकांचे क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे पीक उत्पादनातील चढ उतार कमी होतील भारतातील पोषण प्रश्नही आटोक्यात येईल.
हवामान बदलामुळे वनस्पती विश्व, प्राणीविश्व, समुद्री जीवन अशा अनेक गोष्टींवर अनिष्ट परिणाम झालेले आहेत. कित्येक वनस्पती-प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. समुद्रातली कोरल रिफ्स नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ही कोरल रीफ्स मत्स्य जीवनाचा आधार असतात. मत्स्यान्न हा जगातला प्रमुख अन्न स्त्रोत आहे आणि कोरल रीफ्स जर नष्ट झाले तर हा अन्न स्त्रोत नष्ट होऊन मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. ही बाब आता कुठेतरी स्वीकारणं, त्यासाठी आपण जबाबदार आहोत हे समजून घेणं जरुरीचं झालेलं आहे.
भारतात हवामान बदल हा विषय लोकांना समजावून देताना भारतीय स्थानिक उदाहरणच का देणं गरजेचं आहे, सोपे शब्द वापरणं का आबश्यक आहे हे लेखक पुन्हा पुन्हा सांगतो. हवामान बदलाचे घातक परिणाम काय होतात आणि हवामान बदल रोखला तर काय होईल हे सर्व सामान्यांपर्यंत पोचवणं यावरही लेखकाने भर दिला आहे. हवामानबदल रोखण्याची झुंज फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावरची, सरकारची, शास्त्रज्ञांची न राहता प्रत्येक सामान्य माणसाच्या व्हायला हवी.
हवामान बदल , त्याला कारणीभूत घटक नियंत्रणात आणणे अतिशय आवश्यक झालेलं आहे आणि थोडक्यात “दिडशहाणं व्हायला पायजेलाय” असं लेखकाचं म्हणणे आहे.
अतिशय सोप्या समजेल अशा भाषेमधे आणि सुंदर, ओघवत्या शैलीत पण गंभीर विषयावर लिहिलेलं हे पुस्तक आहे. अतिशय महत्त्वाचा असा सजिव सृष्टिच्या जीवनमरणाचा विषय हाताळलेला आहे. मराठी मनांना हवामानबदलाच्या रौद्रतेचा परिचय या पुस्तकातून लेखकाने करून दिलेला आहे त्यासाठी लेखकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.