मराठी भाषा गौरव दिन : ‘ई-बुक्‍स’चा वापर वाढावा

नव्या युगातील प्रकाशनाचा नवा पर्याय

पुणे – मागील काही वर्षांपासून मराठी भाषेत “ई-बुक्‍स’चा ट्रेन्ड रुजत आहे. पुस्तकप्रेमींना ई-बुक्‍समुळे एका क्‍लिकवर पुस्तके उपलब्ध होत आहेत. मात्र, प्रकाशनाच्या मुख्य प्रवाहात “ई-बुक्‍स’ला प्रतिष्ठा मिळणे आवश्‍यक आहे. याशिवाय प्रकाशक, लेखकांनी या नव्या माध्यमाचा विचार करण्याची गरज असून, ई-बुक्‍सच्या निर्मितीवर भर द्यायला हवा, असे मत व्यक्‍त केले जात आहे.

छापील पुस्तकांच्या जोडीने मागील काही वर्षांपासून “ई-बुक्‍स’, “ऑडीओ बुक’ असे काही बदल घडत आहेत. अनेक वाचकांकडून, विशेषत: तरुणाईकडून सहज उपलब्ध होणाऱ्या ई-बुक्‍सला विशेष पसंती मिळत आहे. पूर्वी केवळ इंग्रजी भाषेतील पुस्तके वाचता येत होती. मात्र आता मराठी भाषेतील ई-बुक्‍स प्रकाशित होत आहेत. मात्र, अद्यापही “ई-बुक’चे प्रमाण तुलनेने कमी आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान “ई-बुक’मध्ये भर पडली. सध्या अनेक प्रकाशक ई-बुक्‍सकडे वळत असून, आगामी काळात यामध्ये वाढ होवून अधिक चांगल्या दर्जाच्या साहित्य निर्मितीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

वाचकांचा ई-बुकला प्रतिसाद
ई-बुक वाचणारी पिढी स्वतंत्र आहे. अनुभवी प्रकाशक आणि नवोदित लेखक यांची सांगड घातली गेली पाहिजे. या दोघांनी मिळून या नवमाध्यमाचा वापर करून मराठी भाषा चिरकाल टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अनेकांना पहिले पुस्तक प्रकाशित करण्यासाठी ई-बुक ही संधी आहे. विखंडीत जगण्यामध्ये सुसंगत आशय पोहोचवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. लॉकडाऊनच्या निमित्ताने आम्ही अधिक “ई-बुक्‍स’ची निर्मिती केली, असे अक्षय वाटवे यांनी नमूद केले.

किंडलवर ई-बुक्‍सला चांगला प्रतिसाद असल्याचा आमचा वर्षभरातील अनुभव आहे. लॉकडाऊनमध्ये दुकानांमध्ये जाणे शक्‍य नव्हते, कुरिअर आणि पोस्टाने पुस्तके मिळणे शक्‍य नव्हते. त्यामुळे अनेकांनी ई-बुक्‍सचा पर्याय निवडला. आम्ही ई-बुक्‍स केल्यानंतर वाचक ई-बुक्‍स खरेदी करत असल्याचे समजले. त्यामुळे प्रकाशकांनी बाऊ न करता ई-बुक्‍सची निर्मिती केली पाहिजे. यामुळे प्रकाशकांचा फायदा आहे. त्यामुळे अधिकाधिक ई-बुक्‍सची निर्मिती व्हायला हवी असल्याचे पॉप्यूलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते यांनी सांगितले.

“मराठी प्रकाशन विश्‍वात डिजिटल प्रकाशनाला प्रतिष्ठा वाढायला हवी. लॉकडाऊननंतर काही प्रकाशन ई-बुकचा विचार करत आहेत. परंपरागत व्यवस्थेमध्ये सुरुवातीला प्रकाशकांकडे साहित्य जाते. त्यानंतर संपादकांकडे जाते. त्यावर संपादकीय मत नोंदवले जाते. त्यानंतर संपादकीय आणि भाषिक संस्कार होतात. ही प्रक्रिया सर्व ठिकाणी समान आहे. हीच प्रक्रिया ई-बुक्‍ससाठी अवलंबवल्यास मराठी भाषेचा सन्मान करणारे साहित्य निर्माण होवू शकते, असे या निमित्ताने म्हणता येईल.’

– अक्षय वाटवे, ई-बुक निर्मिती समन्वयक आणि सल्लागार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.