लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सव अंतर्गत पर्यावरण पूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रामध्ये पार पडलेल्या या कार्यशाळेमध्ये लोणावळा शहरामधील बहुतांश शाळांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याचा आनंद व अनुभव घेतला.
माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने सलग दुसऱ्यावर्षीही “पर्यावरणपूरक गणपती बनवा’ कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन मावळ तालुका कलाशिक्षक संघटनेचे अध्यक्ष आशिष थोरात, नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय सुतार, लेखापाल नीलेश काळे, सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिन शेडगे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळ तालुका कला शिक्षक संघटनेचे सचिव रमेश बोंद्रे, कला शिक्षक राजेंद्र दिवेकर, सागर तावरे, लोणावळा नगरपरिषदेचे माजी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षणचे समन्वयक अक्षय पाटील, विजय लोणकर, खंडू बोभाटे यांच्यासह लोणावळा नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते विविध शाळांच्या कला शिक्षकांनी देखील या कार्यशाळेला भेट दिली.
सहभागी विद्यार्थ्यांना लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने कार्यशाळेसाठी लागणारे साहित्य मोफत पुरविण्यात आले आहे. सोबतच मुलांना पिण्याचे पाणी बिस्कीट व सहभाग प्रमाणपत्र याचे वाटप करण्यात आले. आशिष थोरात यांनी मुलांना गणपती बाप्पा बनवण्याची सोपी पद्धत सांगत, त्यांच्याकडून गणपती बनवून घेतले.
सलग दुसऱ्यावर्षी उपक्रम
सहभागी मुलांनी अतिशय सुंदर अशा गणपती बाप्पांच्या शाडू मातीच्या मूर्ती तयार केल्या. गणपती बाप्पांचे नयन रम्य रुप पाहून मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगणित झाला होता. स्वतःच्या हाताने बनवलेले बाप्पा मुले घरी घेऊन गेली. मागील दोन वर्षापासून लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे.