गुवाहाटी – अर्जेंटिनाचे दिग्गज फुटबॉलपटू दिवंगत दिएगो मॅराडोना यांचे दुबईतून चोरीला गेलेले किमती घड्याळ आसाममधून जप्त करण्यात आले. ते घड्याळ चोरणाऱ्याला आसाम पोलिसांनी अटक केली.
दुबईतील एका कंपनीने मॅराडोनाच्या काही वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. त्यामध्ये हबलोट घड्याळाचाही समावेश होता. ते घड्याळ आणि इतर सामग्री ठेवण्यात आलेली तिजोरी काही महिन्यांपूर्वी चोरीला गेली. त्यावरून दुबई पोलिसांच्या रडारवर आसाममधील एक रहिवासी आला. दुबई पोलिसांनी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
त्यानंतर आसाम पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर घड्याळ चोरणाऱ्यापर्यंत पोलीस पोहचले. तो दुबईतील कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. वडिलांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देऊन त्याने रजा घेतली.
ऑगस्टमध्ये तो आसाममधील घरी परतला. आता घड्याळ चोरीबद्दल तो पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. त्या घड्याळाची किंमत सुमारे 20 लाख रूपयांपर्यंत असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले. मॅराडोना यांनी 2010 मधील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेवेळी हबलोट घड्याळ घातले होते. चोरीला गेलेले घड्याळ तेच होते का याविषयीची माहिती समजू शकली नाही.