पुणे – भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारा आणि गाव नकाशा एकमेकांशी लिंक केला आहे. पुणे जिल्ह्यात 1 हजार 910 गावे असून त्यापैकी 1 हजार 800 गावांचे गावनकाशे सातबारा उताऱ्याशी लिंक झाले आहे. यामुळे जमिनीच्या चतु:सीमा, लगतचे गट नंबर त्याचे मालक कोण आहेत, याची माहिती भूमी अभिलेख विभागाने घरबसल्या उपलब्ध करून दिली आहे. यामुळे जागा दाखविली एक आणि खरेदी केल्यानंतर ती असते दुसरीकडेच असे गैरप्रकार टळणार आहे. यासुविधेमुळे जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीची फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे.
सातबारा उतारा आणि जमिनीची नकाशा एकमेकांशी लिंक केल्यामुळे जमिनीची खरेदी आणि दस्त नोंदणी करण्यापूर्वी ही सर्व माहिती एका क्लिकवर मिळत आहे. यापूर्वी गाव तलाठ्याच्या कार्यालयात जाऊन सर्व माहिती घ्यावी लागत होती. त्याची आता गरज लागणार नाही. सातबारा उतारा गाव नकाशाशी लिंक केल्यामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्यातील अथवा गावातील जमिनींची आकांक्ष-रेखांक्षसह (जीएसआय) सर्व माहिती तुम्हाला सहजरीत्या उपलब्ध होणे शक्य झाले आहे.
एवढेच तर ज्या सर्व्हे नंबर अथवा गटनंबर मधील जमीन तुम्ही खरेदी करीत आहात, त्या सर्व्हे नंबरचे एकूण क्षेत्र, त्यात असलेले पोटहिस्से, त्यांचे मालक यांचीदेखील माहिती मिळणार आहे. भूमी अभिलेख विभागाने गाव नकाशे पीडीएफमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांची निशुल्क प्रिंट काढून दस्त खरेदीलादेखील जोडता येणार आहे. त्यामुळे जमिनीची खरेदी करणे आता अधिक सोपे होणार आहे. तर जमिनींच्या खरेदी-व्रिकी व्यवहारात होणाऱ्या फसवणुकीलादेखील यामुळे आळा बसणार आहे.
गाव-नकाशे सातबारा उताऱ्याशी लिंक
राज्यात एकूण 44 हजार गावे आहेत. त्यापैकी 37 हजार गावांतील गावनकाशे सातबारा उताऱ्याशी लिंक करण्यात आले आहेत. हे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच उर्वरित सर्वच गावांतील गावनकाशे लिंक करण्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.