‘आयटी’त वाढतेय खदखद; कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्‍न उपस्थित

पिंपरी – कामाचा ताण-तणाव आणि वरिष्ठांकडून वाढत असलेल्या दबावामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा आयटीयन्समधील खदखद समोर आली आहे. कॉग्निझंटसारख्या बहुराष्ट्रीय कंपनीमधील कर्मचाऱ्यावर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याइतपत बिकट परिस्थिती का निर्माण व्हावी? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दुसरीकडे पहिल्यांदाच आयटी क्षेत्रात आयटीयन्सची “जस्टिस फॉर चेतन जायले’ ही चळवळ जोर धरू लागली आहे.

गेल्या आठवड्यात कॉग्निझंटमध्ये काम करणाऱ्या चेतन जायले या तरुणाने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या पत्रात त्याने आपल्या दोन वरिष्ठांना यासाठी जबाबदार ठरवले. या आत्महत्येने आणि सुसाईड नोटने आयटी क्षेत्रात खळबळ माजलीस आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर संबंधित कंपनीने साधे दुख:ही जाहीर केले नाही. शिवाय फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज (फाईट) या आयटीयन्सच्या संघटनेचे निवेदन स्विकारण्यासाठी सुरक्षारक्षक पाठवून या आत्महत्येच्या जखमेवर मीठ चोळले. कंपनीने घेतलेल्या या भूमिकेमुळे आयटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

सध्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्याने केलेल्या या आत्महत्या प्रकरणी दैनिक “प्रभात’ने आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या निकटवर्तीयांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की चेतन जायले हा एक सुशिक्षित आणि समजूतदार तरुण होता. वरिष्ठांकडून होत असलेल्या त्रासाची पराकाष्ठा झाल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. भावनेच्या आवेगात किंवा रागाच्या भरात त्याने आत्महत्या केली नसून त्याने खूपच विचारपूर्वक आत्महत्या केली असल्याचे सुसाइड नोटवरुन भासते. केवळ पाच ओळींच्या सुसाईड नोटमध्ये कुठेही खाडा-खोड नाही किंवा त्याच्या हस्ताक्षरावरुन तो घाबरला किंवा गोंधळला असल्यासारखे वाटत नाही. त्याने जो त्रास भोगला आहे, तो इतरांना भोगावा लागू नये, एवढीच त्याची अपेक्षा दिसते. चेतन जायले इतर कोणत्याही प्रकारचे टेन्शन नव्हते, तो आर्थिक अडचणीत किंवा इतर कोणत्याही विवंचनेत नव्हता. आयटी क्षेत्रात कर्मचाऱ्यांना दिला जाणार हा त्रास कुठेतरी थांबावा, अशी अपेक्षाही चेतन जायले यांच्या निकटवर्तियांनी व्यक्‍त केली.

कर्मचारी निराशेच्या गर्तेत
गेल्या काही वर्षांपासून आयटी क्षेत्रात नौकऱ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. नविन कर्मचारी कमी पगारात उपलब्ध होत असल्याने अनुभवी कर्मचारी कमी करण्यावरच कंपन्यांचा भर आहे. आयटी क्षेत्रातील रहाणीमान, रोजचा खर्च, छानछौकी जीवन जगण्याची लागलेली सवयी आणि त्यातच नौकरीची खात्री नसल्याने येथील कर्मचारी निराशेच्या गर्तेत सापडला आहे. याशिवायही आयटी कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या असल्याने या समस्या सोडविण्याकडे कंपनी व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज आहे. असे न झाल्यास चेतन जायले सारख्या घटना पुढेही घडू शकतात, अशी भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे या घटना टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)