पिंपरी, दि. १७ – पिंपरी-चिंचवडचे पोलीस सह आयुक्त पदावर विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली. मनोज लोहिया हे यांनी यापूर्वी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर परिक्षेत्र येथे वेगवेगळ्या पदांवर कर्तव्य बजावले आहे. सप्टेंबर २०२० मध्ये लोहिया हे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर बढतीने गेले होते.
राज्याच्या गृह विभागाने शनिवारी (दि. १७) भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. त्यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले मनोज लोहिया यांची पिंपरी-चिंचवडचे पोलीस सह आयुक्त पदावर बदली करण्यात आली. लोहिया यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी हे पदही होते. ते पद आता पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यात आले असल्याचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
लोहिया हे कोल्हापूर परिक्षेत्रातील सातारा येथे सन १९८८ मध्ये परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक होते. सन २०१२ ते सन २०१५ ही तीन वर्ष ते पुणे ग्रामीण येथे पोलीस अधीक्षक पद सांभाळले आहे.
शहराला दुसऱ्यांदा मिळाले सह आयुक्त
११ सप्टेंबर २०१९ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, मुंबई हे पद पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वर्ग करण्यात आले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस सह आयुक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील प्रकाश मुत्याळ यांची नियुक्ती करण्यात आली होती.