जालना : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज अंतरवाली सराटी गावात जाहीर सभा घेण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी मराठा बांधवाना आंतरवाली सराटी गावात येण्याचे आवाहन केले होते. या सभेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला. नागरिक मोठ्या संख्येने येथे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आजच्या या सभेत मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आजच्या या सभेसाठी जालन्यात 1 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन सुरु असताना आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावेळी हे आंदोलन देशभरात पोहोचले. त्या घटनेनंतरही मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते. राज्यातील राजकीय नेते उपोषण स्थळी जाऊन त्यांची भेट घेत होते. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण थांबवण्यासंदर्भात विनंती केली.
स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपोषण स्थळी जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र जरांगे पाटील यांनी जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नसल्याचे सांगितले. राज्यभरातून त्यांच्या मागणीला आणि उपोषणाला समर्थन मिळाले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना एक महिन्याच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटलांनी आपले उपोषण मागे घेतले. त्यानंतर आज त्यांची आंतरवाली सराटी गावात सभा पार पडणार आहे.
दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे यांनी राज्यव्यापी दौरा केला होता. यातच त्यांनी 14 ऑक्टोबरच्या सभेला येण्यासाठी आमंत्रण दिले होते. आजच्या सभेत जरांगे पाटील सरकारला देण्यात आलेल्या 40 दिवसांची मुदत संपण्यापूर्वी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा उपस्थित करू शकतात. तसेच मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत व ओबीसीतून आरक्षणाचा शासन निर्णय हातात घेऊनच ते आंदोलन मागे घेणार असल्याचे यावेळी सांगू शकतात.
नियोजन व्यवस्था
- या सभेसाठी चार ठिकाणी 100 एकरवर पार्किंगची व्यवस्था असणार आहे.
- 10 लाख पाण्याच्या बाटल्यांची सोय.
- सभेसाठी तब्बल 600 भोंग्याचा वापर
- तब्बल 150 एकर मैदानावर सभा होणार
- सभेसाठी 15 फूट उंचीचा स्टेज उभारला