मुंबई – ‘जय मल्हार’ या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री ईशा केसकर (Isha Keskar) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. स्टार प्रवाहवरील नवीन मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच या मालिकाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. यातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या देखील पसंतीस पडत आहे. स्टार प्रवाहसोबतची ईशाची ही पहिलीच मालिका आहे. यामुळे ती या मालिकेसाठी खूप उत्सुक आहे.
या नव्या मालिकेचा प्रोमो ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला. “‘माझ्या तीन लेकी ज्या कोणाच्या घरात जातील त्या लक्ष्मीच्या पाऊलांनी’…” असं लिहीत ‘स्टार प्रवाह’ने नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री ईशा केसकर आणि किशोरी अंबिये दिसत आहेत.
View this post on Instagram
‘कला खरे’ असे ईशाच्या भूमिकेचे नाव असून एका वेगळ्या रुपात ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नावाप्रमाणेच कला एक उत्तम कलाकार आहे. ‘कला’ला हातकाम, रंगकला आणि चित्रकलेची आवड आहे. या भूमिकेविषयी तिने सांगितले की, “सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या कलाला गरीब-श्रीमंत असा भेद केलेला आवडत नाही. हे पात्र प्रत्येकाला आपलसे वाटणारे आहे. संपूर्ण कोल्हापूर शहरात तिने बनवलेले दागिने प्रसिद्ध आहेत.”
“या मलिकेत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळतेय. किशोरी अंबिये माझ्या आईची भूमिका साकारत आहेत. किशोरी ताईंसोबत याआधीही काम केलं आहे. आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे. हेच प्रेम कला आणि आमच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे,” असा विश्वासही तिने व्यक्त केला.