Manohar Joshi Passed Away। राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
कोण होते मनोहर जोशी ?
मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रायगड जिल्ह्यातील नांदवी छोट्याशा गावात झाला. त्याचे शिक्षण चौथीपर्यंत नांदवीला, पाचवी महाडला, सहावीनंतर पनवेलला मामांकडे. मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करून मित्राच्या खोलीत भाड्याने राहिले. जेवणाची सोय महाजन नावाच्या महिलेनी केली. अकरावीला शिकण्यासाठी मुंबईला बहिणीकडे आले.
हेही वाचा
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हरपला ! माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
सहत्रबुध्दे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करून शिक्षण सुरु ठेवले. किर्ती कॉलेजमधून बी. ए. केले. पुढे मुंबई महानगरपलिकेत क्लार्कची नोकरी केली. पुढे वयाच्या 27 व्या वर्षी एम.ए., एल एल.बी. केली. दरम्यान, 1964 ला अनघा यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांचा एक मुलगा व दोन मुली असा परिवार होता.
नगरसेवक ते मुख्यमंत्री Manohar Joshi Passed Away।
समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी यांनी 1967 साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रीय सहभागी झाले. पुढे महानगरपालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला. विशेष म्हणजे 1999 ते 2002 या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.
वयाच्या 72 व्या वर्षी पीएच.डी
वयाच्या 72 व्या वर्षी ‘शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून सन्मानार्थ डी. लिट. ही मानद पदवी मिळाली.
व्यावसायिक जीवन
2 डिसेंबर 1961 ला नोकरी सोडून कोहिनूर या नावाने क्लासेसपासून व्यवसायाला सुरुवात केली. नंतर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केली. शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे हा त्यामागचा उद्देश होता. आज भारतभर 70 शाखा व दरवर्षी 12 हजारपेक्षा जास्त विद्यार्थाना शिक्षण मिळत आहे. कोहिनूर ग्रुप आज शिक्षण क्षेत्राबरोबरच हॉटेल, हॉस्पिटल, बांधकाम व विकास आणि उर्जा क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करीत आहे.
ठाकरे कुटुंबातील चार पिढ्यांसोबत काम केलं…
शिवसेना वाढवण्यात मनोहर जोशी यांचा देखील मोठा वाटा आहे. आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी एकाच शिवसेना पक्षासाठी वाहून दिले होते. विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या चार पिढ्यांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उध्दवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत मनोहर जोशी यांनी काम केले आहेत.