मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर, श्वास घेण्यास त्रास; ‘एम्स’मध्ये दाखल

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत मंगळवारी अचानक बिघडल्यामुळं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं आणि छातीत दुखत असल्यामुळे त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात AIIMS मध्ये भरती करण्यात आलं आहे.

मनमोहन सिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. सध्या ते राजस्थानमधून राज्यसभा सदस्य आहेत. त्यांनी 2004 ते 2014 पर्यंत पंतप्रधानपदाचा कार्यभार सांभाळला आहे. 2009 मध्ये एम्समध्येच त्यांच्यावर बायबास शस्त्रक्रिया झाली होती.

मनमोहन सिंग यांच्यावरील उपचारासाठी एम्सकडून एक टीम बनवली जात असून त्याचे प्रमुख हे डॉ. रणदीप गुलेरिया असणार आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती काँग्रेसचे सचिव प्रणव झा यांनी दिली आहे.

काँग्रेसचे सचिव प्रणव झा यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे की, ‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या आरोग्याशी संबंधित काही निराधार अफवा पसरत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर नियमित उपचार सुरु आहेत. आम्ही आवश्यकतेनुसार अपडेट देत राहू. आम्ही माध्यमांतील मित्रांचे त्यांच्याबाबत चिंता व्यक्त करण्यासाठी आभार मानतो’.

मनमोहन सिंग 19 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना एम्समध्ये भरती करण्यात आलं. सिंग यांना थोडा ताप आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. तत्तूर्वी सिंग यांनी 4 मार्च आणि 3 एप्रिल रोजी कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.