- पिंपरी-चिंचवड नावाच्या समावेशाकडे दूर्लक्ष
पिंपरी – पुणे मेट्रो ही पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात धावणार आहे. मात्र, या प्रकल्पाचे नाव पुणे मेट्रो केल्याने पिंपरी चिंचवडकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. याबाबत, पिंपरी चिंचवड महापालिकेने वारंवार पिंपरी चिंचवड- पुणे मेट्रो असे नाव देण्याची मागणी केली आहे. तसेच फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत पिंपरी चिंचवड -पुणे मेट्रो नामकरण करण्याबाबतचा ठरावही मंजूर केला आहे. त्याबाबत महामेट्रोने कोणताच निर्णय न घेता केवळ चालढकल करण्यातच धन्यता मानल्याचे वारंवार समोर येत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रत्यक्ष नागरिकांना येत्या डिसेंबर महिन्यापासून मेट्रोमधून प्रवास करता येणार असल्याचा दावा व्यवस्थापकीय संचालकांनी केला आहे. या दोन शहरामधून धावणाऱ्या मेट्रोला फक्त पुणे शहराचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांमध्ये नाराजी आहे. त्याची दखल राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील घेतली आहे. जानेवारी 2020 मध्ये मेट्रोचे डब्बे शहरात आल्यानंतर त्यांची विधीवत पूजा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आली. त्याचवेळी महापौरांनी मेट्रोला “पिंपरी चिंचवड- पुणे मेट्रो’ असे नाव द्यावे, अशी मागणी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडे केली. त्याबाबतचा लेखी प्रस्ताव देखील मेट्रोकडे सादर करण्यात आला. तसेच फेब्रुवारी 2020 मध्ये याबतचा ठराव महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला. महापालिकेचा ठराव असल्यास कार्यवाही करणे सुलभ होईल असे अधिकाऱ्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. मात्र ठराव करून दीड वर्ष उलटले तरीही नामकरणाचा ठराव थंड बस्त्यात गुंडाळून ठेवण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोचे काम 60 टक्के पूर्ण झाले आहे. तर काही स्टेशनचे काम शंभर टक्के झाले आहे. पूर्ण झालेल्या मार्गावर पुणे मेट्रो असाच उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रोच्या नावामध्ये बदल करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी तात्काळ घ्यावा व त्यासाठी सत्ताधाऱ्यांनी राजकीय इच्छाशक्तीही पणाला लावावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेने दिलेला ठराव राज्य सरकारकडे पाठवला आहे. राज्य सरकारकडून यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे “पिंपरी चिंचवड -पुणे मेट्रो’ नामकरणाचा घोळ सुटलेला नाही. राज्य सरकारकडून परवानगी मिळाली तर पुणे मेट्रोचे पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो असे नामकरण केले जाईल.
डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो