- चौकशी समितीकडून उच्चस्तरीय चौकशीची शिफारस
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकच्या नगरसेविका अर्चना बारणे यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या मृत्यूचे गुढ आणखीनच वाढले असून महापालिकेने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याची शिफारस केली आहे.
थेरगाव येथील नगरसेविका अर्चना बारणे यांचे 13 जुलै रोजी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. खासगी रुग्णालयाने त्यांचे निधन डेंग्यूमुळे झाल्याचे सांगितले. तर, महापालिकेने डेंग्यूमुळे निधन झाले नसल्याचे स्पष्ट केले. यावरून महापालिका सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी बारणे यांचा मृत्यू नेमका कशाने झाला, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, त्यांच्यावर चुकीचे उपचार करण्यात आल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली होती. सभेत महापौर माई ढोरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
त्यानुसार, महापालिकेच्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने बारणे यांच्यावरील उपचाराची माहिती घेऊन संबधित कागदपत्राची तपासणी केली. या तपासणीनंतर समितीने त्यांच्या मृत्यूबाबत उच्चस्तरीय चौकशी करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. ससून जनरल रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, या प्रकारामुळे अर्चना बारणे यांच्या मृत्यूचे गुढ आणखी वाढले आहे.