कोल्हापूर – मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार माणगाव ग्रामपंचायतीने महावितरणच्या थकित कर वसुली साठी १२९ अतंर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार एक कोटी ३२ लाख रुपयांचा फाळा कर महावितरण कंपनीने तत्काळ ग्रामपंचायतीकडे भरावा अशी नोटीस काढली आहे अशी माहिती सरपंच राजू मगदूम यांनी दिली आहे. महावितरण कंपनीने मुदतीत कराचा भरणा भरावा अन्यथा ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार पुढील जप्तीची कारवाई करणार याबाबतची नोटीस बजावली असल्याचे मगदूम यांनी म्हटले आहे.
महावितरण कंपनी आणि माणगाव ग्रामपंचायत यांच्यामध्ये फाळा कर वसुलीसंबंधी कायदेशीर लढाई झाली. कोर्टाने याप्रश्नी ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल देत कर वसुलीचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. महावितरणाने कराची रक्कम भरण्यास असमर्थता दाखविली होती म्हणून माणगाव ग्रामपंचायतीने विरोधात दाखल केलेल्या हायकोर्टातील याचिकेचा निकाल माणगाव ग्रामपंचायतीच्या बाजूने लागला होता.
सरपंच मगदूम यांनी म्हटले आहे, महावितरणच कंपनीचे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणारे डीपी, पोल, हायटेन्शन पोल, उपकेंद्राचा फाळा कर आकारणी करण्याचा अधिकार ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील तरतुदीनुसार १२९ ची कारवाई करून वसूल करण्यास हायकोर्टाने माणगाव ग्रामपंचायतीस परवानगी दिली आहे. त्यानुसार माणगाव ग्रामपंचायतीने रीतसर महावितरणकडे कोर्टाच्या निकालानुसार १२९ अंतर्गत नोटीस देऊन तत्काळ एक कोटी ३२ लाख रुपयाचा फाळा कर तात्काळ ग्रामपंचायतीकडे भरणा करावा असे कळविले आहे.