मुंबई – महागाईने सध्या सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंसह इंधनाच्या दरात वाढ होत आहे. त्यात आणखी भर पडली असून काही दिवसांपूर्वीच महावितरणनेही वीजदरात वाढ केली आहे. यामुळे नवीन सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारला विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही याच विषयावरून सत्ताधारी शिंदे सरकारवर हल्ला चढवला असून महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होताच नागरिकांना वीजदरवाढीची भेट दिली असल्याचे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.
“महाराष्ट्रात नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं आहे. यापूर्वी गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. दूग्धजन्य पदार्थ व अन्नधान्यांवर जीएसटी हे दोन गिफ्ट या सरकारने दिलेच होते. आता वीजदरवाढीचं हे तिसरं गिफ्टदेखील जनतेला देण्यात आलं आहे”, असे सुप्रिया सुळे ट्वीटरद्वारे म्हणाल्या आहेत.
तसेच, ही वीजदरवाढ निषेधार्थ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपणास विनंती आहे की, कृपया जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, असेदेखील सुप्रिया सुळे ट्वीटद्वारे एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्रात नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं.यापूर्वी गॅसच्या दरात रु ५० ची वाढ आणि त्यानंतर दूग्धजन्य पदार्थ व अन्नधान्यांवर जीएसटी हे दोन गिफ्ट या सरकारने दिलेच होते. आता हे तिसरं गिफ्ट देखील जनतेला देण्यात आलं आहे. pic.twitter.com/rB770ixs0U
— Supriya Sule (@supriya_sule) July 9, 2022