हिंसाचार माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – येडियुरप्पा
बेंगळूरु : मंगळूर येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबीयांना जाहीर करण्यात आलेली प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत कर्नाटक सरकारने मागे घेतली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली.
आंदोलनादरम्यान 19 डिसेंबरला पोलिसांकडून गोळीबार घडल्यानंतर लगेचच गोळीबारात ठार झालेल्यांच्या नातेवाईकंना 10 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र आज अचानक मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा मागे घेतली.
“पोलिसांच्या गोळीबारामध्ये मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबत अद्याप निर्णय व्हायचा आहे. कारण गुन्हेगारांना आर्थिक मदत देणे हा देखील एक अक्षम्य अपराध आहे.’ असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मॅरेथॉन बैठक घेतल्यानंतर ही मदत मागे घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला.
गुरुवारी केरळवरून परतल्यावर येडियुरप्पा यांनी रात्री आणि सकाळीही अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठका घेतल्या. मंगळूरुमध्ये 19 डिसेंबरला दंगल माजवणाऱ्या गुंडांची ओळख निश्चित करावी. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी सूचना आपण पोलिसांना केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंगळूरुमधील हिंसाचार एक कारस्थान होते, हे आता स्पष्ट झाले आहे. पोलिसांवर फेकण्यात आलेले दगड ऑटोरिक्षा आणि ट्रॉलीतून आणले गेले होते. ही जाळपोळ आणि हिंसाचारामध्ये सहभागी झालेल्यांची पार्श्वभुमी तपासून बघितली जाईल आणि गुन्ह्यात हात असलेल्यांना अटक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.