दुसऱ्या घटनेत निषेधासाठी रस्त्यावर उतरले ग्रामस्थ
श्रीनगर : पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला. त्याशिवाय, पाकिस्तानी माऱ्यात दोन ग्रामस्थ जखमी झाले.
पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत असणाऱ्या भारतीय हद्दीतील रामपूर क्षेत्रात गोळीबार केला. त्या गोळीबाराचे लक्ष्य भारतीय लष्कराचा अधिकारी ठरला. पाकिस्तानी सैनिकांनी उरी भागातही मारा केला. त्यांनी डागलेल्या काही तोफगोळ्यांचा स्फोट रहिवासी भागात झाला. त्या माऱ्याला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेच्या (आयबी) लगतही मारा केला. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील रहिवासी भागाला लक्ष्य केले. त्या माऱ्यामुळे संतापलेले ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. त्यांनी निदर्शने करत पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या.
चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पाकिस्तानी सैनिक सीमेलगत असणाऱ्या गावांवर मागील दोन महिन्यांपासून सातत्याने मारा करत आहेत.
त्यामध्ये घरांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. पाकिस्तानी कुरापतींना जबरदस्त प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांनी अवलंबले आहे. त्यात पाकिस्तानची मोठी हानी होत असूनही त्या देशाकडून शस्त्रसंधी भंगाचे सत्र कायम आहे.