ताजमहालमध्ये बॉम्बची अफवा पसरवणाऱ्याला अटक

नवी दिल्ली/ आग्रा,  – जगप्रसिद्ध ताजमहालच्या परिसरामध्ये बॉम्ब असल्याची अफवा आज पसरली. त्यामुळे ताज महालच्या परिसरातील पर्यटकांना बाहेर काढून परिसराची कसून तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान बॉम्बबाबत अफवा असल्याचे निष्पन्न झाले आणि ही अफवा पसरवणाऱ्या विमल कुमार सिंह नावाच्या व्यक्‍तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, असे आग्रा विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक ए सतीश गणेश यांनी सांगितले.

विमल कुमार सिंह याने उत्तर प्रदेश पोलिसांचा आपत्कालिन सेवेसाठीच्या “112” या क्रमांकावर सकाळी 9 वाजता फोन केला आणि ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवला गेला असल्याचे सांगितले. ताजमहालची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी त्वरित “सीआयएसएफ’ला कळवले. “सीआयएसएफ’ने ताजमहालच्या परिसरातील नागरिकांना बाहेर काढले आणि परिसराची कसून तपासणी केली.या तपासणीदरम्यान ताजमहालच्या परिसरात काहीही संशयास्पद आढळून आले नाही. सुमारे पावणे दोन तासांनी ताजमहाल पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला, असे “सीआयएसएफ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉम्बबाबत अफवा पसरवणारा विमल कुमार सिंह हा कासगंजमधील पटियालीचा रहिवासी असून तो सध्या फिरोजाबादच्या नरखी भागातल्या ओखरा गावात आपल्या आजीच्या घरी राहतो आहे. तो मानसिक दृष्ट्या अस्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती प्राथमिक चौकशीत उघडकीस आली आहे. त्याने असा फोन का केला होता, याची चौकशी केली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.