नवी दिल्ली – शाहजहान शेख हा धोकादायक गुन्हेगार आहे आणि ईडीला इतर गुन्ह्यांसह रेशन घोटाळ्यात तो हवा आहे. शिवाय विविध प्रकरणांत अभिषेक बॅनर्जीही अडकलेले आहेत. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काॅंग्रेसच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता बॅनर्जी अशा सर्वच गुन्हेगारांना पाठिशी घालण्यात अग्रेसर आहेत, असा आरोप भाजपचे पश्चिम बंगाल व्यवहार सहप्रभारी अमित मालवीय यांनी केला आहे.
तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्याविरोधात जारी करण्यात आलेल्या लुकआऊट नोटीसवर मालवीय यांचे वक्तव्य आले आहे. अमित मालवीय लिहिले की, पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी पश्चिम बंगालच्या डीजीपींना शेख शाहजहानला तात्काळ अटक करण्याचे आणि दहशतवादी संघटनांशी असलेल्या त्याच्या संबंधांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र संदेशखळीचा डॉन असल्याचे सांगणारा शहाजहान फरार आहे.
पश्चिम बंगालच्या गृहमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या आश्रयाशिवाय हे शक्य नाही. ममता बॅनर्जी यांचा गुन्हेगारांना वाचवण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. बोगतुई हत्याकांडानंतर लगेचच ममता बॅनर्जी आरोपी अनुब्रता मंडलसोबत त्यांच्या अधिकृत कारमध्ये फिरताना दिसल्या. शेख शहाजहान कुठेही असला तरी त्याच्या संरक्षणात आहे यात शंका नाही. पण ममता ज्याप्रमाणे अनुब्रताला वाचवू शकल्या नाहीत, त्याचप्रमाणे त्या शाहजहानलाही वाचवू शकणार नाही.
गुन्ह्यांवर उभारलेले रक्तलांछित साम्राज्य कोसळत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल पोलिसांना शहाजहान शेखला अटक करून केंद्रीय यंत्रणांच्या ताब्यात देण्याचे निर्देश द्यावेत.