पुणे : डॉ. नेहा कुशवाह आणि आदित्यसिंग बिस्ट या दोघांचा विवाह ठरला. फेब्रुवारीत साखरपुडाही झाला. त्यानंतर 2 मे हा लग्नाचा मुहूर्त होता. ठरल्याप्रमाणे देहराडूनला लग्न होणार होते. मात्र, कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे त्यांना सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले. मात्र, पुणे पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत डॉ. नेहा आणि आदित्य यांचा विवाह सोहळा घडवून आणला आहे.
लॉकडाऊनमुळे आणि कर्तव्यावर हजर असल्यामुळे दोघांच्याही घरचे कोणीही नातेवाईक या लग्न सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, पोलिसांनी ती उणीव दूर करत वऱ्हाडी मंडळीपासून, ते कन्यादानासह नवरा आणि नवरी मुलीच्या पाठीमागे उभा राहणारे मामाही पोलीसच झाले. अगदी थोड्या पोलिसांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत हडपसरमध्ये पोलिसांनी हा विवाह सोहळा पार पडला.
देहराडून येथे लष्करात कार्यरत असलेले कर्नल देवेंद्रसिंग बिस्ट यांचा मुलगा अदित्य आणि नागपूर येथील लष्कर मेडिकल कॉलेज येथील कर्नल डॉ. अरविंद सिंग कुशवाह यांची मुलगी डॉ. स्नेहा यांचे लग्न 2 मे रोजी ठरले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे लग्नाला अडथळे येत होते. दोन्हीही परिवार देहरादून आणि नागपूर येथे अडकून पडले आहेत. केवळ वधू आणि वर हे पुण्यात होते.
दरम्यान, कर्नल देवेंद्र सिंग यांनी हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्याशी संपर्क केला. त्यानुसार पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी पोलीस आयुक्त डॉ. के वेंकटेशम् यांच्या मार्गदर्शनानुसार हा विवाह सोहळा घडवून आणला.