Mallikarjun Kharge : इंडिया आघाडी या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या अध्यक्षपदसाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर एकमत झाले आहे अशी माहिती या आघाडीच्या सूत्रांनी दिली आहे. याचा अर्थ विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व कोणता पक्ष करणार हा प्रश्न निकाली निघाला असून आता कॉंग्रेसच्याच नेतृत्वाखाली ही आघाडी कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खर्गेंच्या निवडीची औपचारीक घोषणा अद्याप बाकी आहे.
इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज ऑनलाइन बैठक झाली. त्यात या निर्णयासह लोकसभा निवडणुकीच्या संबंधात व्यापक चर्चा झाली. या बैठकीला तृणमूल काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि समाजवादी पक्षाचे नेते उपस्थित राहिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गटाचे अध्यक्ष म्हणून खर्गे यांच्या नियुक्तीवर एकमत झाले आहे.
नेत्यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयु पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांना या आघाडीचे संयोजक बनवण्याचा निर्णय घेतला, परंतु ज्या पक्षांचे प्रतिनिधी बैठकीत उपस्थित नव्हते त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय विकास सर्वसमावेशक आघाडी (इंडिया) च्या बॅनरखाली तब्बल २८ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.
नितीशकुमारांच्या इच्छेनुसारच कॉंग्रेसकडे नेतृत्व
बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांनी आज इंडिया आघाडीचे संयोजक होण्यास नकार दिला आणि त्यांनी स्वत:च ही जबाबदारी कॉंग्रेसपक्षातीलच कोणी तरी घ्यावी अशी सूचना केली.
जागावाटपाचा अजेंडा, भारत जोडो न्याय यात्रेतील सहभाग आणि युतीशी संबंधित इतर बाबींचा आढावा घेण्यासाठी शनिवारी दुपारी इंडिया आघाडीची बैठक झाली त्यात नितीशकुमार यांनी ही सूचना केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजेरी लावली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आके स्टॅलिन आणि पक्षाच्या नेत्या कनिमोझी करुणानिधी, आदि नेते उपस्थित होते.