Delhi MCD Election Result 2022 : दिल्लीच्या पराभवातही भाजपाला मोठा दिलासा

नवी दिल्ली :– दिल्ली पालिका निवडणुकीत पराभव झाला तरी समाधान मानाव्या अशा काही बाबी भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. जिंकलेल्या वॉर्ड संख्येत शतकी मजल पार करून भाजप मजबूत विरोधी पक्ष म्हणून पुढे आला आहे. एवढेच नव्हे तर, यावेळी भाजपच्या वाट्याला आलेल्या मतांमध्ये वाढ झाली आहे.
मागील पालिका निवडणुकांत त्या पक्षाला 36.08 टक्के मते मिळाली होती. यावेळी ते प्रमाण 39.09 टक्के इतके आहे. म्हणजेच, भाजपच्या मतांमध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिल्ली जिंकणाऱ्या आपच्या मतांमध्ये तर दुप्पट वाढ नोंदली गेली आहे.
मागील वेळी त्या पक्षाच्या वाट्याला 21.09 टक्के मते आली होती. यावेळी ते प्रमाण 42.05 टक्के इतके आहे. यावेळी आणखी जागा कमी झालेल्या कॉंग्रेसला मतांमधील घसरणीने दुहेरी धक्का दिला आहे. त्या पक्षाला मागील वेळी 21.09 टक्के मते मिळाली होती. यावेळी कॉंग्रेसच्या वाट्याला केवळ 11.68 टक्के मते आली.





