मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 30 जानेवारीला मतदान पार पडले असून, 2 फेब्रुवारीला या निवडणुकांचा निकाल जायीर करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट या तिन्ही बलाढ्य पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली. तीन मोठे पक्ष समोर असल्याने पराभव होणार माहीत असूनही सत्यजित तांबे यांनी मैदानात झुंज दिली अन् मोठ्या फरकाने विजय मिळवला.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत शुभांगी पाटील यांनी चांगलं आव्हान निर्माण केलं होतं. पण त्यांचा पराभव झाला. यावेळी सत्यजित तांबे यांना 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला आहे. दरम्यान, या विजयानंतर सत्यजित यांच्या पत्नी मैथीली तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्या माध्यमांशी बोलत होत्या.
मैथीली तांबे म्हणाल्या… ‘सत्यजित आणि सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन… सगळ्यांच्या कष्टामुळे आजचा हा विजय पाहता आला. मित्र परिवार आणि नातेवाईकांचे आभार, जनतेचे आभार… मला खात्री आहे की सत्यजित कायम लोकांच्या हितासाठी काम करत राहतील. जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवतील यात कुठलीच शंका नाही.” असं मैथिली यावेळी म्हणाल्या आहेत.